नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांच्या जनआक्रोश हल्लाबोल आंदोलनाने हे अधिवेशन वादळी ठरणार अशी अपेक्षा होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सिंचनास्त्र बाहेर काढल्यानंतर विरोधक विधीमंडळात मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं.


अधिवेशनात विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, राज्यातील महिलांची सुरक्षितता आदी मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसंच अधिवेशन काळात नागपुरात झालेले चोरीचे प्रकार आणि रुग्णालयातून आरोपींचे पलायन या मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

त्याचबरोबर भाजप आमदार आशिष देशमुख आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नाराजीचा मुद्दाही अधिवेशनादरम्यान चांगलाच गाजला. सरकारही विरोधकांचा प्रत्येक वार परतवून लावण्यात यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळालं. या अधिवेशनातही पोलिसांवर उपासमारीची वेळ आल्याचं दिसून आलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या सगळ्या प्रश्नांवर सभागृहात उत्तर देणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे.