औरंगाबाद : रस्त्यावर होणाऱ्या टवाळखोरांच्या त्रासाला औरंगाबादमधील रचनाकार कॉलनीतले लोक कंटाळले आहेत. रचनाकार सोसायटीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. हाणामारीची ही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहेत.


गेल्या काही दिवसांपासून या सोसायटीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा टवाळखोरीपणा वाढलाय. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रचनाकार कॉलनी ही औरंगाबादेतील उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. बाजूला देवगिरी महाविद्यालय आहे, याच महाविद्यालयातील टवाळ मुलं या समोरील प्रांगणात येतात आणि धांगडधिंगा  सुरू असतो.

केक कापणे, तो केक एकमेकांना फासण्यासाठी चाललेली धडपड, वेगवेगळे आवाज काढणं, जोरात हॉर्न वाजवून जेणेकरून या भागात राहणाऱ्या लोकांना त्रास होईल, असं सगळं ही टवाळखोर करतात. यामध्ये मुलींचाही सहभागी असतो.

रहिवाशांनी अनेक प्रयत्न केले, मात्र टवाळखोर त्यांना काही घाबरत नाहीत. कॉलनीत सीसीटीव्ही बसवले, त्यानंतरही हा धांगडधिंगा सुरूच आहे. आता लोकांनी घराच्या बाहेर पडणं सोडलं आहे. महाविद्यालयात अनेक तक्रारी केल्या, पण हे टवाळखोर ना महाविद्यालयाला घाबरतात, ना पोलिसांना.

मुलांनी वाढदिवस साजरा करावा, पण अशा पद्धतीने त्याचा इतरांना त्रास होत असेल तर ही गंभीर बाब आहे. पोलिसांनाही असल्या टवाळखोरांना एकदा कायद्याचा धाक दाखवायला हवा. अन्यथा अशा महाविद्यालया शेजारील नागरिकांना विनाकारण याचा त्रास होतच राहिल.

पाहा व्हिडीओ :