Nagpur News : कर्जबाजारी झालेल्या एका नोकरानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने मालकाच्या घरात चोरी करण्याची टीप दिल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली. कळमना बाजारातील (kalamna Market) एका व्यापाऱ्याच्या घरातून 56 लाखांची चोरी झाली होती. या संदर्भात पोलिसांनी नोकरासह तीन आरोपींना अटक करुन 27 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. मिथिलेश माखनसिंग मानकूर (वय 22, गुलशन नगर), भूपेश रमेश डोंगरे (वय 44, पाचपावली) आणि आशिष उर्फ डेंबो भीमराव भैसारे (वय 26, पाचपावली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


चिखली चौकात राहणारे भाजीचे व्यापारी उमेश निपाने यांच्या घरातून 20 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 56 लाख रुपयांची चोरी झाली. डुप्लिकेट चावीने कुलूप उघडल्याने कुणीतरी जवळचाच व्यक्ती यात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी निपाने यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पोलिसांना यादरम्यान मिथिलेशवर संशय आला. निपाने त्याला अनेकदा चावी देऊन घरी पाठवत असे. त्याला घराची संपूर्ण माहिती दिली. कर्जबाजारीपणामुळे मिथिलेश अडचणीत आल्याने पोलिसांचा संशय बळावला. सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीत पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच मिथिलेशने चोरी केल्याची कबुली दिली.


त्याने त्याचा मित्र आशिष भैसारे याला मालकाच्या घरात चोरीची युक्ती सांगितली. आशिषची गुन्हेगार भूपेश डोंगरेशी मैत्री आहे. त्यांनी भूपेशला माहिती दिली. निपाने यांचे घर पाहिल्यानंतर भूपेशने त्याचा मित्र गुन्हेगार मुश्ताक ऊर्फ भाईजान याला काम करुन देण्यास सांगितले.


योजनेनुसार मिथिलेशने दोन महिन्यांपूर्वी निपाने यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाची डुप्लिकेट चावी बनवली होती. त्याने आशिषला चावी दिली. आशिषने भूपेशमार्फत मुश्ताककडे चाबी सुपूर्द केली. निपाणे यांचा फ्लॅट पाहिल्यानंतर मुश्ताकने त्याच्या दोन साथीदारांवर चोरीचे काम सोपविले. 20 ऑक्टोबरला सकाळी मिथिलेशने निपाने बंधू दुकानात आल्याची माहिती आशिषला दिली.


आशिषने मुश्ताकला भूपेशच्या माध्यमातून ही बाब कळवली. त्याच्या दोन्ही साथीदारांनी फ्लॅटचा मुख्य दरवाजा डुप्लिकेट चावीने उघडला व कपाटाचे लॉकर फोडून रोख रक्कम चोरुन नेली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 27 लाख रुपये आणि दुचाकी जप्त केली आहे.


इतर महत्त्वाची बातमी


Agriculture News : चक्क कॅडबरीप्रमाणं सजले 'पानांचे डाग' 50 ते 60 वर्षाची परंपरा, फटाके वाजवून शेतकऱ्यांचं स्वागत