Agriculture News : सध्या राज्यात सर्वत्र दिवाळीचा (Diwali)उत्साह पाहायला मिळत आहे. आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज आहे. या दिवाळी सणानिमित्त बाजरपेठा सजल्या आहेत. दिवाळीत आपण सजलेल्या भेट वस्तू पाहत असतो, मात्र पंढरपूच्या (Pandharpur) बाजार समितीत शेतकऱ्यांनी चक्क कॅडबरीप्रमाणे विड्यांच्या पानांचे डाग (bundle chewing leaf) सजवून आणले आहेत. अतिशय आकर्षक पद्धतीनं हे पानांचे मोठं मोठं डाग सजवले असून, डब्यांना ग्लिटरिंग पेपर, झुरमळ्या, जिलेटीन पेपर, फुगे, रंगबेरंगी गोफ याच्या मदतीने ही सजावट करण्यात आली आहे.


फटाक्यांची आतिषबाजी करुन शेतकऱ्यांचं स्वागत


सांगली, कोल्हापूर आणि सातारा या भागातील पानमळे असणारे शेतकरी दिवाळी पाडव्यासाठी हे पानांचे डाग घेऊन पंढरपूर बाजार समितीमध्ये आले होते. या शेतकऱ्यांचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी करुन करण्यात आलं. पंढरपुरातील पान व्यापारी समीर मोदी यांनी शेतकऱ्यांचं स्वागत केलं. या अनोख्या स्वागतामुळं बळीराजा सुखावला आहे. विशेष म्हणजे नुसते दिलदारपणे स्वागत करुन हे व्यापारी थांबले नाहीत तर चक्क एका एका डागाला तब्बल 18 हजार रुपयांचा विक्रमी भाव देखील दिला आहे.




पानांच्या डागाला 18 हजारांचा भाव, शेतकरी समाधानी


दिवाळी पाडव्याला पानाचं महत्व असल्यानं अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील पानमळे असणारे शेतकरी पंढरपूरच्या बाजार समितीमध्ये आपले डाग घेऊन येत असतात. आज या पानांच्या एका डागाला 18 हजारांचा भाव मिळाल्यानं शेतकरी समाधानी झाले आहेत. एका डागात 12 हार पाने असतात म्हणजे एक पान दीड रुपये दरानं होलसेल भावात विकले गेले आहे. या देशी पानात जुनवानं, कळी, नवती अशा जातीची पाने विक्रीसाठी बाजारात आली आहेत. समितीमध्ये पानविडाच्या पानांना विक्रम दर मिळाला आहे. यामध्ये आज परंपरेनुसार कोल्हापूर, सांगली, तासागांव, बिलेवाडी यासह सोलापूर जिल्ह्यातील भागातून शेतकरी आपला पानांच्या डागांची पारंपारीक पध्दतीनं सजावट करुन बाजरात घेऊन आले होते. यावेळी 300 हून अधिक पानांचे डाग बाजारात विक्रीसाठी आले होते.




50 ते 60 वर्षांची परंपरा  


जवळपास 200 ते 250 किलोमीटर अंतरावरुन शेतकरी पानांची विक्री करण्यासाठी पंढरपूरच्या बाजार समितीत येतात. दिवाळी सणात पानांचे डाग सजवून आणायची 50 ते 60 वर्षांची परंपरा असल्याची माहिती व्यापारी समीर मोदी यांनी दिली. आज डागाला चार ते पाच हजार रुपयांचा खर्च करुन शेतकरी या बाजारपेठात येतात. त्या डागाला चांगला दर दिला असल्याचे मोदींनी सांगितले. त्यामुळं शेतकरी समाधानी असल्याचे समीर मोदी यांनी सांगितले. दोन वर्षानंतर दिवाळी मोठ्या जोरात होत आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी आपले पानांचे डाग सजवून आणल्याची माहिती व्यापारी मोदी यांनी दिली. 




महत्त्वाच्या बातम्या:


Parbhani: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; अग्रीम पीकविमा मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास झाली सुरूवात