नागपूर : विजय वागधरे नावाच्या संबंधित गुंडाने कुंभारपुरात दुपारी अल्पवयीन मुलाला चाकू मारून जखमी केल्यानंतरही पोलीस कारवाई करत नाही, उलट संध्याकाळी गुंड पुन्हा वस्तीत येऊन शिव्या देतो, हे पाहून जमाव संतापला आणि त्या ठिकाणी हत्येची घटना घडली. दगड, विटांनी ठेचून आणि चाकूने भोसकून विजय वागधरेचा खून करण्यात आला.


पोलिसांनी हत्या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेला फक्त रविवारचंच भांडण कारणीभूत नाही तर गेल्या अनेक महिन्यांच्या गुंडगिरीची आणि त्याबाबद्दल नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतर ही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याची धक्कादायक पार्श्वभूमी आहे.


धक्कादायक म्हणजे नागरिकांनी सदर घटनेबाबत फक्त स्थानिक पोलीस स्थानकातच तक्रार केली होती असं नाही, तर पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांकडे ५०० नागरिकांनी एकदा नव्हे तर, दोन वेळेला लेखी तक्रारही केली होती.


मात्र, त्यानंतरही पोलिसांनी गुंड विजय वागधरे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर ठोस कारवाई केली नव्हती. ती झाली असती तर अशी घटना घडलीच नसती, थोडक्यात लोकांनी कायदा हातात घेतला नसता असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे.


IND vs ENG 1st Test Live Updates 


इथं लक्षात घेण्याजोगी बाब अशी की, रविवारी जिथं उभं राहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर क्राईम कॅपिटल असून त्यास फडणवीस जबाबदार आहेत असा आरोप केला होता, तिथून अवघ्या 500 मीटर अंतरावर अजित पवारांचे भाषण सुरू असतेवेळीच कुंभारपुरात भर रस्त्यात ही घटना घडत होती.


नागपूरात एवढी गुन्हेगारी का आहे, त्यास पोलिसांची निष्क्रियता कशी कारणीभूत असते हे दाखवणारी दुर्दैवी घटना ठरत आहे. राज्यात नागपुरात गुन्हेगारीचा आलेख सात्तत्यानं उंचावताना दिसत आहे. मुख्य म्हणजे ही बाब अतिशय चिंताजनक वळणावर पोहोचली असून, फोफावणारी गुन्हेगारी नियंत्रणात आणणं आणि या वृत्तीचाच नायनाट करणं यासाठी पावलं उचलली जाण्याची गरज प्रकर्षानं जाणवू लागली आहे.