नागपूर : भाजपमधून आलेल्या नाना पटोले यांना चार वर्षात आठ महत्त्वाची पदं का दिली गेली असा सवाल काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी विचारला आहे. राज्यात इतर नेत्यांमध्ये योग्यता नाही का? एकाच नेत्याचे एवढ्या वेळा लाड का पुरवले जातात? असे सवालही आशिष देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.
गावागावात रुजलेली काँग्रेस आणि त्यामध्ये नेतृत्वाची खाण असताना वारंवार एकच हिरा (नाना पटोले) बाहेर का निघतो? यामागचा काय राज आहे? हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळत नाही. कदाचित पक्षश्रेष्ठींना कळत असावं असा टोलाही आशिष देशमुख यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ आणि समजूतदार नेत्याला त्रास देण्याचा काम नाना पटोले यांनी केलं आहे, म्हणूनच थोरात यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणं कठीण झालंय असं मत व्यक्त केल्याचंही आशिष देशमुख म्हणाले.
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "सत्यजित तांबेंसारख्या तरुण तडफदार नेत्याला काँग्रेसपासून दूर करण्यात आलं. चांगल्या तरुण नेत्यांना काँग्रेसपासून दूर करण्याचं कामच नाना पटोले महाराष्ट्रात करत आहेत. सत्यजित तांबे यांच्यासोबत धोका झाला. त्यांचा छळ झाला. नाशिकच्या जागेसाठी नागपूर आणि औरंगाबादचे एबी फॉर्म पाठवण्याचं कारण काय होते?. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. शिवाय हंडोरे यांच्या पराभवासंदर्भातही चौकशी झाली पाहिजे. त्यासंबंधित रिपोर्ट अजूनही प्रलंबित आहे."
नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकानंतर एक घोळ होत आहेत. भोंगळ कारभार सुरू आहे आणि त्यास विद्यमान प्रदेशाध्यक्ष कारणीभूत आहेत असा आरोप काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला. नाना पटोले यांच्या कारभारावर नेतेच नाही तर कार्यकर्तेही नाराज आहेत असून अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी नेतृत्व बदल अनिवार्य असल्याचं आशिष देशमुख म्हणाले.
प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक घ्या...
मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवडीप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही निवडणुकीच्या माध्यमातून ठरावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस पक्षात नेहमी असे घोळ का होतात असा सवाल आशिष देशमुख यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, "गेल्या चार वर्षात नाना पटोले यांना आठ पद मिळाली आहेत. महाराष्ट्रात दुसरं नेतृत्व नाहीच का? एकाच नेत्याचे एवढ्या वेळेला लाड का पुरवले जात आहेत? गावागावात रुजलेली काँग्रेस आणि त्यामध्ये नेतृत्वाची खाण असताना वारंवार एकच हिरा बाहेर का निघतो? यामागचा काय राज आहे? हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळत नाही. कदाचित पक्षश्रेष्ठींना कळत असावं."
नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद मिळालं, मात्र त्यांनी ते सोडलं आणि त्यामुळेच पुढे विधानसभा अध्यक्षपद रिकामं राहिलं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यासाठी नाना पटोले हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे. येत्या दहा तारखेला मुंबईत आम्ही एक बैठक बोलावली आहे आणि त्यामध्ये सर्वांना निमंत्रित केलं आहे. त्यात पक्षाकडून वरिष्ठ नेते निरीक्षक म्हणून यावेत अशी आमची इच्छा असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.