Nagpur News : नागपूर पोलीस दलातील उपायुक्तांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली असून त्यात शहराला आणखी सहा नवे पोलीस उपायुक्त देण्यात आले आहेत. शहरातील दहापैकी सहा पोलीस उपायुक्तांची बदली केल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी शहराला दोन पोलीस उपायुक्त पदोन्नतीने मिळाले होते. यासोबतच शहरातील (Nagpur Police) दोन उपायुक्त गजानन राजमाने आणि संदीप पखाले यांची बदली झाली आहे.

मागील सहा महिन्यांपासून पोलीस अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. चार दिवसांपूर्वी पोलिसांच्या बदल्यांची एक यादी काढण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या अश्विनी सयाजीराव पाटील आणि संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक असलेले राहुल मदने यांचा समावेश होता. त्यानंतरही शहरात चार पोलीस उपायुक्तांची जागा रिक्त होती. विशेष म्हणजे शहर गुन्हेशाखा उपायुक्त चिन्मय पंडित हे प्रतिनियुक्तीवर राज्याबाहेर जाणार असल्याने त्यांचेही पद काही दिवसांनी रिक्त होणार होते. दरम्यान सोमवारी (7 नोव्हेंबर) सायंकाळी जारी परिपत्रकानुसार नागपूर शहराला श्रवण दत्त, धोंडोपंत स्वामी, अनुराग जैन, सुनील लोखंडे, मुमक्का सुदर्शन, गोरख भामरे असे सहा नवे उपायुक्त मिळाले आहेत.

शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारे 'मॅन इन अॅक्शन' उपायुक्त गजानन राजमाने यांची मुंबईच्या फोर्स वन इथे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. याशिवाय संदीप पखाले यांनी ग्रामीण भागात अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण अधीक्षक विजय मगर यांनाही पुणे शहर उपायुक्त तर राजलक्ष्मी शिवणकर यांची पुणे लोहमार्ग अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

एसीबी अधीक्षकपदी राहूल माकणीकर

ग्रामीण विभागात अपर पोलीस अधीक्षक असलेले राहूल माकणीकर यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय विश्वा पी. पानसरे यांना सीआयडीच्या (CID) पोलीस अधीक्षक, विश्वास द. पांढरे नागरी हक्क संरक्षण अधीक्षक, प्रियंका नारनवरे यांची राज्य राखीव दल गट क्र. 4 च्या समादेशकपदी तर यशवंत सोळंके यांची महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक पदावर बदली केली आहे.

बदल्या या प्रमाणे

अधिकाऱ्याचे नाव यापूर्वीची पदस्थापना नवीन नियुक्ती
श्रवण दत्त अपर पोलिस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा पोलीस उपायुक्त, नागपूर शहर
धोंडोपंत स्वामी मुंबई उपायुक्त पोलीस उपायुक्त नागपूर
अनुराग जैन   लातूर अपर पोलिस अधीक्षक नागपूर पोलीस उपायुक्त
सुनील लोखंडे  ठाणे-पोलीस उपायुक्त आर्थिक सेल पोलिस उपायुक्त, नागपूर
मुमक्का सुदर्शन  अपर पोलीस अधीक्षक, परभणी पोलीस उपायुक्त, नागपूर शहर
गोरख भांबरे  अपर पोलीस अधीक्षक, वाशीम पोलीस उपायुक्त, नागपूर शहर
राहूल माकनिकर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर विभाग
संदीप पखाले  पोलीस उपायुक्त, नागपूर शहर  ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक
विश्वा पी. पानसरे  पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग  नागपूर विभाग
विश्वास द. पांढरे  उप आयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई नागरी हक्क संरक्षण, अधीक्षक
प्रियंका नारनवरे पोलीस उपायुक्त, पुणे  समापदेशक, राज्य राखीव दल गट क्र. 4 नागपूर
यशवंत सोळंके अपर पोलीस अधीक्षक, वर्धा  पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, नागपूर

हेही वाचा

Bharat Jodo Yatra: ठरलं! भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे 'हे' दिग्गज नेते होणार सहभागी, शरद पवारांच्या उपस्थितीबाबत साशंकता