Aurangabad News: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत टीका करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असतानाच, शिवसेनेच्या नेत्यांकडून देखील सत्तार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अब्दुल सत्तार हे नेहमी निजामाच्या प्रवृत्तीने बोलतात अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली असून, चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांना मंत्रिमंडळातून हाकलून देण्याची मागणी केली आहे.
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, अब्दुल सत्तार हे नेहमी निजामाच्या प्रवृत्तीने बोलतात. राष्ट्रीय महिला आयोगाने सत्तार यांच्या वक्तव्याची दखल घायला पाहिजे. तर अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा यांचे काही देणे घेणे नाही. सत्तार हे नेहमीच निजामच्या प्रवृत्तीनेच बोलत असतात, त्यामुळे त्यांच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा काय ठेवणार?असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केला. तर महिला खासदारांबद्दल अशा गलिच्छ पद्धतीने टीका करणाऱ्या सत्तार यांनी मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी खैरे यांनी केली आहे.
सत्तार यांच्या औरंगाबादच्या घरावर दगडफेक...
सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबादच्या रोजाबाग परिसरातील घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांकडून सत्तार यांच्या घराच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच घराचे मुख्य गेटमधून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. यावेळी उपस्थित पोलिसांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा बोलवत आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर आज दुसऱ्या दिवशी देखील राष्ट्रवादीकडून शहरात आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अब्दुल सत्तारांनी दिलगिरी व्यक्त केली...
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचे राज्यभरातून विरोध होत आहे. तर राज्यातील अनेक भागात आंदोलने देखील करण्यात येत आहे. दरम्यान शिंदे गटाचे काही आमदार देखील त्यांच्या विधानामुळे नाराज असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अखेर सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. महिलांचा कोणताही अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता, पण माझ्या वक्तव्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सत्तार म्हणाले. मात्र याचवेळी ज्यांच्याबद्दल सत्तार यांनी हे विधान केले होत, त्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सत्तार यांनी अजूनही वैयक्तिक माफी मागितली नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.