Sudha Murthy In Kolhapur : प्रख्यात लेखिका तसेच इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी कोल्हापूरला भेट देत तब्बल सात दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. अत्यंत साध्या आणि सेवाभावी असलेल्या सुधा मूर्ती यांनी सोमवारी कोल्हापुरातील 70 वर्षांपूर्वीचे त्यांचे जुने निवासस्थान शोधून आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबत त्यांच्या मोठ्या बहिणी सुद्धा होत्या. सुधा मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक अलीकडेच इंग्लंडचे पंतप्रधान झाले आहेत. 


सुधा मूर्ती यांचे मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेतील लेखन मोठ्या प्रमाणावर वाचले जाते. कोल्हापुरातील त्यांच्या दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान, सुधा मूर्ती आणि त्यांची बहीण मंगला कुलकर्णी यांनी रंकाळा, अंबाबाईला तर भेट दिलीच, पण प्रकाशक अनिल मेहता यांच्या वाचनालयाला आणि त्यांच्या घरालाही भेट दिली. 70 वर्षांपूर्वी आपले बालपण जिथे घालवले ते घर पाहण्याची मूर्ती यांची मनोकामना होती. वडिलांनी ज्या घरात आयुष्य घालवले ते घर पाहताना त्या चांगल्याच भावूक झाल्याचे दिसून आले.  सुधा मूर्ती अडीच वर्षांच्या असताना त्या राहत असलेल्या घरात डोकावून पाहिले तेव्हा त्या पूर्णपणे भारावून गेल्या होत्या. धाकट्या बहिणीचा जन्म झाला त्या घराच्या अंगणातही त्या काही काळ रेंगाळल्या. 


कुरुंदवाड येथील घरालाही भेट


मोडकळीस आलेली घरे, तुळई आणि लटकलेल्या जळमटातून चालत सुधा मूर्ती यांनी कुरुंदवाडमधील त्यांच्या घराची पाहणी केली आणि आठवणी सांगितल्या. माझे घर, येथील जिव्हाळा मी कधीही विसरू शकत नाही, मला कोल्हापूरची मुलगी असल्याचा अभिमान आहे, अशा भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केल्या. नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिरात जाऊनही त्यांनी दर्शन घेतले.


अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन  


सुधा मूर्ती यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. 


सांगलीमध्ये भिडे गुरुजींची भेट 


दरम्यान, इन्फोसिसच्या प्रमुख सुधा मूर्ती काल सांगलीमध्येही होत्या. तिथे एका कार्यक्रमामध्ये त्यांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांची भेट झाली. त्यावेळी या दोघांमध्ये चार ते पाच मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर सुधा मूर्ती संभाजी भिडे यांचे दर्शन घेतले. 


इतर महत्वाच्या बातम्या