नागपूर : नागपुरात बिल्डरच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी सहा मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पल्लवी नागुलवार यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा फॅमिली फ्रेण्ड्सविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


नागपुरातील बांधकाम व्यावसायिक राहुल नागुलवार यांच्या पत्नी पल्लवी यांनी 9 मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुसाइड नोटमध्ये त्यांनी सहा कौटुंबिक मित्रांनी मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.

तपासानंतर पोलिसांनी अविनाश घुसे, संजय महाकाळकर, राकेश तिडके, संजय गिलहुरकर, पंकज पवार आणि एकावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. संजय महाकाळकर हे काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आहेत.

नागपूरच्या काही बिल्डर्सचा "friends couple" अशा नावाचा ग्रुप होता. सर्व जण प्रत्येक जोडप्यामागे दर महिन्याला 25 हजार रुपयांची भिशी करायचे. एका ठिकाणी जमून पार्टी करायचे.

ग्रुपमधील अविनाश घुसे नावाचा बिल्डर पल्लवी नागुलवार यांना सतत मेसेज, फोन कॉल करुन मानसिक त्रास द्यायचा. पल्लवी यांनी यासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतर उर्वरित सर्वांनी एकत्रित येऊन नागुलवार दाम्पत्याला 'फ्रेण्ड्स कपल' ग्रुप मधून बाहेर काढलं होतं.

तेव्हापासून मानसिक दबावात असलेल्या पल्लवी यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.