नागपूर : केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नागपूरमध्ये आयोजित अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या अहवालाद्वारे हा दावा करण्यात आला.

संघाचे महासचिव कृष्ण गोपाल यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, नागालँड, मिझोरम आणि काश्मीरच्या खोऱ्याव्यतिरिक्त देशाच्या सर्वच भागात रा.स्व.संघाचे काम मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. सध्या संपूर्ण देशभरात एकूण 37 हजार 109 ठिकाणी 58 हजार 976 शाखा लागत आहेत.

त्यांनी पुढे सांगितलं की, 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार येण्याच्या दोन महिने पूर्वी देशातील 29 हजार 624 ठिकाणी 44 हजार 982 शाखा लागत होत्या. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून यात मोठी वाढ झाली. मार्च 2015 मध्ये 33 हजार 223 ठिकाणी 51 हजार 332 शाखा लागण्यास सुरुवत झाली. तर 2016 मध्ये 36 हजार 867 ठिकाणांवर 56 हजार 859 शाखा लागल्या. गेल्या वर्षी मार्च महिन्यात 36 हजार 729 ठिकाणी 57 हजार 165 शाखा लागण्यास सुरुवात झाली.

आणखी एका रिपोर्टनुसार, यूपीए सरकारच्या काळात म्हणजे 2009 मध्ये संघाच्या शाखांमध्ये चार हजारांनी घट झाली होती. पण यापूर्वी अशा प्रकारची नोंद करण्यात आली होती. या रिपोर्टनुसार, भारत आणि परदेशात एकूण 1.25 लाख नागरिक संघाचं स्वयंसेवक झाले.

दुसरीकडे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात भाजपची ताकद देखील वाढत आहे. सध्या 21 राज्यात भाजप आणि घटक पक्षांचे सरकार आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 70 टक्के भू-भागावर भाजपचं राज्य आहे.