''नाशिक मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलंय. पण या बापाने कधीही या शहराकडे पाहिलं नाही. असा बाप आम्हाला नको. भाडोत्री बापाची आम्हाला गरज नाही. आता बस्स झालं. परिवर्तनाची तयारी करा आणि यांना खड्यासारखं बाजूला करा. आजपासूनच कामाला लागा,'' असं आवाहन शरद पवारांनी केलं.
''नाशिक महत्त्वाचा जिल्हा आहे. इथले लोक प्रचंड मेहनत घेतात. मात्र सरकार पाठिशी नाही. शेतीचं उत्पन्न घटलं आहे. ज्वारी, बाजरी, तूर, सूर्यफुल या पिकांचे दर घटले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही म्हणून हे होतंय. त्यामुळे दुष्परिणाम होत आहे. यासाठी काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे,'' असं शरद पवार म्हणाले.
''आजचे राज्यकर्ते मोठे गमतीदार आहेत. घोषणा करण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाही. मुक्तपणे बोलायचं आणि करायचं काहीच नाही म्हणून राज्यात एक वेगळं चित्र निर्माण झालं आहे. 100 टक्के कर्जमाफी देण्याची ताकद यांच्यामध्ये नाही,'' असं म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात केलेली आत्महत्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा आणि अंमलबजावणी यातला बोजवारा या सगळ्या मुद्द्यावरुन सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा थेट शाब्दिक हल्लाबोल पवारांनी चढवला.