नागपूर : 18 महिन्यांचं मूल म्हटलं की ते आई-बाबा, काऊ-चिऊ या बोबड्या बोलांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. काही चुणचुणीत मुलं बडबडगीतंही पाठ करतात. मात्र नागपूरच्या एका चिमुरडीने आपल्या स्मरणशक्तीने भल्या-भल्यांना बुचकळ्यात टाकलं आहे.

18 महिन्यांच्या चिमुकल्या अद्विकाच्या स्मरणशक्तीमुळे भले-भले चाट पडले आहेत. अनेक देशांची नावं, त्यांची चलनं, तिथली प्रसिद्ध ठिकाणं, पक्षी-प्राण्यांची मराठी आणि इंग्रजी नावं, महापुरुषांची नावं आणि त्यांची विशेषणं, राज्य आणि त्यांचे नृत्यप्रकार अद्विकाला अगदी तोंडपाठ आहेत.

मुलं रांगायला लागली, चालायला लागली की आसपासचं जग आपल्या नजरेत सामावून घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरु होते. त्यांची ही धडपड पाहून चिमुकल्यांचे आई-वडीलही त्यांना प्रत्येक नवीन गोष्ट समजवून सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र नागपुरात राहणाऱ्या आसावरी बले आणि सागर बले या दाम्पत्याला आपल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला काय नवीन शिकवावे असा प्रश्न पडला आहे.

ही चिमुकली जरा मूडी आहे, पण एकदा का या बाईसाहेब रंगात आल्या की धडा-धडा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात करतात. आईच्या तोंडातून प्रश्न निघाला नाही की लगेच उत्तर हजर.

मुलं साधारण वर्ष-दीड वर्षाची झाली की आई-बाबा, काऊ-चिऊ, मामा-दादा अशे सोपे शब्द उच्चारायला सुरुवात करतात. मात्र अद्विका म्हणजेच पिहूने बोलायला सुरुवात केली आणि महिन्याभरात अनेक कठीण शब्द तिला अगदी पाठ झाले. तिची ही प्रगती पाहून सुरुवातीला तिच्या आई-वडिलांना धक्काच बसला.

लहानग्या अद्विकाच्या या स्मरणशक्तीचं तिच्या आई-वडिलांना मोठं कौतुक आहे पण त्यांना तिला कुठल्याही स्पर्धेत उतरवायचं नाही. त्यांना फक्त आपल्या मुलीची स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढावी एवढीच अपेक्षा आहे.

अद्विका या शब्दाचा अर्थच खरं म्हणजे अद्वितीय किंवा विलक्षण असा. या चिमुरडीने आपल्या नावाचा अर्थ खरा करुन दाखवला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरु नये.