मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने शहरातल्या वाडीया पार्कवर जणू मराठ्यांचा जनसागरल लोटला होता. अंगावर काळे कपडे आणि हातात भगव्या पताका घेतल्यानं अवघं वाडिया पार्क भगवं झालं. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला.
वाडिया पार्कवरची गर्दी पाहता हा मोर्चा आतापर्यंतचा सर्वात भव्य मोर्चा ठरण्याची शक्यता आहे. या मोर्चामध्ये महिला आणि मुलींचं प्रमाणही लक्षणीय आहे.
कोपर्डीतील पीडित मुलीच्या वडिलांनीही या मोर्चात सहभाग घेतला.
दरम्यान प्रत्येक मोर्चाप्रमाणे याही मोर्चात राजकीय नेत्यांची हजेरी लागली आहे. नगरमधल्या मोर्चात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले.
******************************************************************************
अहमदनगर : राज्यभर पसरलेलं मराठा क्रांती मोर्चानं आज आपला मोर्चा अत्याचाराच्या घटनास्थळी वळवला आहे. अहमदनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे.
कोपर्डीतील पीडित मुलीच्या वडिलांनीही मोर्चामध्ये सहभाग घेतला आहे.

ज्या कोपर्डीच्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आहे, त्या नगरमध्येच आज मोर्चा असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या मोर्चाकडे लागलं आहे.
सकाळपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक मोर्चाच्या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली. पावसाळी वातावरण असूनही पुरुषांसह महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि अॅट्रोसिटी कायद्यात बदल करा अशी सर्व मोर्चेकऱ्यांची मागणी आहे.
संबंधित बातमी - अहमदनगर मराठा क्रांती मूक मोर्चा स्पेशल अपडेट
मराठा मोर्चे कुठे कुठे निघाले?
औरंगाबाद (9 ऑगस्ट), उस्मानाबाद (25 ऑगस्ट), जळगाव (29 ऑगस्ट), बीड (30 ऑगस्ट), परभणी (3 सप्टेंबर), हिंगोली (17 सप्टेंबर), नांदेड (18 सप्टेंबर), जालना (19 सप्टेंबर), अकोला (19 सप्टेंबर), लातूर(19 सप्टेंबर), नवी मुंबई (21 सप्टेंबर) , सोलापूर (21 सप्टेंबर), अहमदनगर (23 सप्टेंबर) या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाने विराट मोर्चा काढला होता.
कुठे मोर्चे निघणार?
नाशिक (24 सप्टेंबर), पुणे (25 सप्टेंबर), वाशिम (25 सप्टेंबर), बुलडाणा (26 सप्टेंबर), नंदुरबार (26 सप्टेंबर), सांगली (27 सप्टेंबर), धुळे (28 सप्टेंबर), बारामती (29 सप्टेंबर), सातारा (3 ऑक्टोबर) इथे मराठा समाजाचा मोर्चा होणार आहेत.