मुंबई : परतीच्या पावसानं उभ्या महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राजधानी मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
जगबुडी नदीला पूर आल्यामुळे पुलाचे कठडे वाहून गेले आहेत, तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही ठप्प आहे. परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादमध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे. तुळजापूर, उमरगा, लोहारा परिसरात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे नांदेडमध्ये रेल्वे ट्रॅकही वाहून गेला आहे. त्यामुळे तिरुपति ते आदिलाबाद, आदिलाबाद ते तिरुपति, आदिलाबाद ते नांदेड आणि नांदेड ते आदिलाबाद या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु असून मुंबईकरांच्या जनजीवनावरही परिणाम झाला आहे.