ठाणे: बॉलीवूड इंडस्ट्रीतील अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणात सध्या मुंबई पोलिसांचा तपास वेगाने सुरु आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शनिवारी रात्री आणखी एका आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील उच्चभ्रू अशा हिरानंदानी इस्टेटला (Hiranandani Estate Thane) लागून असणाऱ्या लेबर कॅम्पमधून मुंबई पोलिसांनी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीचे नाव मोहम्मद अलियान असे आहे. त्याने सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर चाकूने हल्ला केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. ठाण्यातील कासारवडवली हिरानंदानी परिसरात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. आरोपी मोहम्मद अलियान (Mohhmad Alian) याची आता मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी केली जाईल. यामधून सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याचा अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मोहम्मद अलियान हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे सांगितले जाते. तो वेष पालटून हिरानंदानी परिसरात असणाऱ्या लेबर कॅम्पमध्ये लपून बसला होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून मोहम्मद अलियान हा कामगारांच्या या वस्तीत लपून बसल्याचे सांगितले जाते. मोहम्मद अलियान याठिकाणी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या लेबर कॅम्पला घेराव घालून मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडले. सैफ अली खानच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीशी मोहम्मद अलियान याचा चेहरा मिळताजुळता असल्याचे दिसत आहे. मुंबई पोलिसांच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे.

मुंबई पोलिसांनी मोहम्मद अलियानला ताब्यात घेतल्यानंतर लगेच त्याची कसून चौकशी केली. त्याला रविवारी सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस न्यायालयात काय माहिती देतात, हे बघावे लागेल. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून थोड्याचवेळात एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामुळे सैफ अली खान हल्लाप्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या या पत्रकार परिषदेची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

मुंबई पोलीस करिनाचा जबाब नोंदवणार

सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून सैफची पत्नी अभिनेत्री करिना कपूरचा जबाब पुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता आहे. हल्लेखोराने घरातील कोणत्याही मौल्यवान वस्तुंना हात लावला नाही. पण एक कोटी रुपये मागितले, अशी माहिती करिना कपूरने पोलिसांना दिल्याचे समजते. याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाणार आहे.

आणखी वाचा

सैफ अली खानची हिंमत वाघासारखी, रक्तबंबाळ अवस्थेत स्वत: रुग्णालयात पोहोचला; डॉक्टरांनी काय-काय सांगितलं?