सातारा:  उसेन बोल्ट...वेगाचा बादशाह...याच उसेन बोल्टला अनेक जण आपला आदर्श मानतात..साताऱ्यातल्या म्हसवड गावातही उसेन बोल्टचा 72 वर्षांचा एक जबरा फॅन आहे. तो फक्त फॅनच नाही..तर बोल्टसारखं तो वेगानं धावतोही.

मुसा मुल्ला असं या 72 वर्षांच्या आजोबांचं नाव.

एका स्पर्धेत उसेन बोल्टला धावताना 72 वर्षांच्या मुसा चाचांनी पाहिलं. आणि दुसऱ्या दिवसापासून ते बोल्टसारखीच स्प्रिंट मारायला लागले.

साताऱ्याच्या म्हसवड गावातल्या मुसा मुल्लांचा वेग पाहून तरणी ताठी पोरंही आडवी होतील.

चाचांच्या गाडीनं पीकअप घेतला की 50 मीटरचं अंतर अवघ्या 9 सेकंदात पार पडतं. व्यायामाच्या बाबतीत या वयातही चाचा जागरुक आहेत.

भिजवलेलं आणि शिजवलेलं खायला हवं, असा सल्ला मुसा चाचा तरुणांना देतात. इतकंच नाही तर आजची तरुणाई झोपल्यानंतरही पांघरुणात मोबाईल घेऊन बसते. कुणाचं ऐकत नाही, असं मुसा चाचा म्हणतात.

माण नदीच्या काठचा डांबरी रस्ता हाच मुसा चाचाचा धावण्याचा ट्रॅक. व्यायामाच्या या आवडीमुळं त्यांची थट्टाही केली जाते.

म्हातारं पळतंय, तुला स्पर्धेला जायचं आहे काय, असं लोक म्हणतात. बाया बापड्या पदराला तोंड लावून अनेकवेळा हसतात, पण मी आपलं काम चालूच ठेवतो, असं मुसा चाचा सांगतात.

हसू देत ओ चाचा... तुम्हाला त्यांची फिकीर नाही... तेव्हा मंडळी... अजूनही अंथरुणात मुटकुळी मारुन झोपला असाल तर उठा... धावा...

कारण म्हातारपणी अंथरुणाला खिळायचंच आहे... आता जरा जगून घ्या... मुसा चाचांसारखे तरुण व्हा.

VIDEO: