अहमदनगर : अहमदनगरमधील विवाहितेच्या हत्येप्रकरणी माजी सरपंच सासरा आणि पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर माजी सरपंच सासूला सात वर्षाची सक्तमजुरी ठोठावण्यात आली आहे. 2016 मध्ये संबंधित महिलेला सासरच्या मंडळींनी जाळून ठार मारलं होतं.
अहमदनगरमधील हिवरे झरे गावात सारिका काटे नावाच्या विवाहितेला सासू-सासरा आणि पतीनं पेटवलं होतं. 'तू गरीब घरातील आहेस' असे टोमणे मारुन तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवलं होतं.
सारिकाची सासू पार्वती काटे आणि सासरे शिवाजी काटे गावातील माजी सरपंच होते, तर तिचा पती नवनाथ काटे हा त्या काळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा वाहनचालक होता.
सासऱ्यांनी सारिकाच्या अंगावर रॉकेल ओतलं तर पती नवनाथने पेटती काडी अंगावर फेकून तिला पेटवलं होतं. सासूनेही त्यांना मदत केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तब्बल नऊ साक्षीदार तपासण्यात आले होते. यामध्ये मृत विवाहितेच्या मुलाचीही महत्त्वाची साक्ष होती. या प्रकरणी दोन वर्षांनी युक्तिवाद पूर्ण झाल्यावर जिल्हा सत्र न्यायालयानं दोषींना शिक्षा सुनावली.