मुंबई : लहानपणी वडिलांच्या उसाच्या गाड्यावर काम करायचो, कुस्ती करायला कोल्हापूरलाही गेलो पण फौजदार व्हायचं स्वप्न होतं. पण परीक्षा नापास झालो आणि त्याचा नाद सोडला अशी आठवण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितली. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर थेट केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे 'एबीपी माझा'च्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. 


फौजदार व्हायचं स्वप्न होतं


पैलवान असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं त्यांना पैलवान व्हायचं नव्हे तर पीएसआय व्हायचं स्वप्न होतं. कोल्हापूरला कुस्तीसाठी गेल्यानंतर फौजदार व्हावं अशी इच्छा होती. त्यासाठी अभ्यास सुरू केला. पुण्यात आल्यानंतर एमपीएससीचा क्लास लावला. एकदा परीक्षा दिली. पण त्यामध्ये नापास झालो आणि नंतर त्याचा नाद सोडला. 


मंत्रि‍पदाची अपेक्षा नव्हती, अनपेक्षित धक्का होता


केंद्रीय मंत्रि‍पदाची जबाबदारी मिळेल याची अपेक्षा नव्हती आणि ते समजल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. ते म्हणाले की, शपथविधीच्या आदल्या दिवशी मला राष्ट्रीय अध्यक्षांच्या पीएचा फोन आला आणि मला शपथविधीसाठी तयार राहायला सांगितलं. सुरुवातीला मला काही समजेना. शेतकऱ्याचा मुलगा होतो, घरच्या उसाच्या गाड्यावर काम केलं. पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी फक्त भाजपमध्येच मिळू शकते. 


मित्रांसोबत पहिल्यांदा संघाच्या शाखेत गेलो


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध कसा आला या प्रश्नाचं उत्तर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, माझं मूळ गाव हे मुळशी तालुक्यातील. पुण्यात शिक्षणासाठी आलो. कुटुंब नवी पेठेत राहायला लागले. दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आम्ही पाच-सहाजण राहायला लागलो. खेळता खेळता मित्रांच्या संगतीने संघात जायला सुरूवात केली.


पहिल्यांदा नगरसेवक कसे झाले? 


मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कोथरुडमध्ये अनेकजण बाहेरून राहायला आले आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदमांचे बंधू हे सातत्याने चारवेळा त्या ठिकाणाहून नगरसेवक होते. त्यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडूक झाली आणि त्या ठिकाणी माझे नाव समोर आलं. त्या ठिकाणी माझ्या गावाकडून आणि परिसरातून लोक राहायला आले होते. पोटनिवडणुकीमध्ये मात्र लोकांनी मला निवडून दिलं. त्यावेळी मला झालेला आनंद हा आतापेक्षाही मोठा होता. त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरींना भेटायला गेलो. त्यावेळी गोपीनाथ मुंडेनी माझं कौतुक केलं होतं. तिथून सुरू झालेला प्रवास आणि नंतर चार वेळा नगरसेवक झालो. 


मी कधीतरी नगरसेवक व्हावं अशी सातत्याने इच्छा होती. त्यावेळी गणेश मंडळाच्या आरतीला नगरसेवक यावा अशी इच्छा होती. माझ्या आतेभावाच्या ओळखीने काँग्रेसचे नगरसेवक गोपाळ तिवारी आरतीला आले. त्यानंतर अपेक्षा वाढली आणि महापौर आरतीला यावे अशी इच्छा होती. माऊली शिरोळकर त्यावेळी महापौर होते, ते आरतीला आले आणि त्यावेळीही मोठा आनंद झाला. 


ही बातमी वाचा: 



Murlidhar Mohol on Kolhapur : राजकारणाची बाराखडी कोल्हापुरात शिकलो : मोहोळ