लातूर : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणावरुन ओबीसी नेते सध्या मनोज जरांगे (Manoj Jarange) एकमेकांना आव्हान-प्रति आव्हानं देतायत. आरक्षणाचा हा लढा नेत्यांच्या अस्मितेचा लढा बनून बसलाय. लक्ष्मण हाकेंनी 10 व्या दिवशी ओबीसींसाठीचं उपोषण मागं घेतलं. त्यातली भाषणं बघून जरांगेंनीही प्रतिआव्हानं दिली. या सर्व पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय जोडे बाहेर सोडून आरक्षणाचा मुद्दा सोडवावा, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा सर्वांनी सर्वानुमते सोडवावा. यासाठी कोणताही राजकीय पक्ष विचार तिथे नकोय. त्या समाजाचा प्रश्न म्हणून तो मार्गी लागला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लातूर येथे व्यक्त केले आहे. ते आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
मराठा आणि ओबीसीच्या जटील प्रश्नावर मार्ग काढेल
दानवे म्हणाले, राजकीय पक्षाने आपले राजकीय जोडे बाहेर सोडून आरक्षणाचा मुद्दा सोडवावा. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे राजकारण कोणीही करू नये. हा विषय कोणत्याही एका राजकीय पक्षाचा विषय नाही तर समाजाचा विषय आहे. आमच्या सरकारने सर्व विरोधी पक्षाची बैठक बोलावून मराठा आरक्षणाचा मार्ग काढला होता. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं होत. मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषणचा मार्ग चालू ठेवला आहे.. सरकार त्यांच्या उपोषणाचा विचार करेल आणि मराठा आणि ओबीसीच्या जटील प्रश्नावर मार्ग काढेल.
लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण लक्ष्मण हाकेंनी स्थगित केलंय. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, तसंच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलंय. छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हाके यांना दिली.उपोषण स्थगित केलं तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं हाकेंनी म्हटलंय..
हे ही वाचा :
Chhagan Bhujbal : ...तर विधानसभा, लोकसभेतही आम्हाला आरक्षण हवं; वडीगोद्रीतून छगन भुजबळांची मोठी मागणी