Akola News अकोला : अजित पवारांनी (Ajit Pawar) वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadhi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) जावं, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केलं होतं. अकोला येथे 'एबीपी माझा' शी साधलेल्या 'एक्सक्लुझिव्ह' संवादादरम्यान त्यांनी आज सकाळी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान, हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


मात्र, सकाळी केलेल्या या वक्तव्यावरून मिटकरींनी आता घुमजाव केले आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्यावर आता अमोल मिटकरींनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांसोबत महायुतीत यावं, असं आपल्या बोलण्याचा अर्थ असल्याचं म्हणत त्यांनी आता आपल्या वक्तव्यावरून यु-टर्न घेतला आहे. तर राष्ट्रवादी आजही महायुतीचाच घटक असल्याचेही अमोल मिटकरी म्हणालेय.


मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला


सोशल मीडिया आणि काही वृत्तवाहिन्यांवर मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी बोललेले वाक्य मोडून-तोडून प्रसारित करण्यात आलं. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने काही पत्रकार बांधव मला विचारणा करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना मी उत्तर दिले. मध्यंतरी महायुतीमध्ये आमचे काही मत मतांतर झाले होते. मात्र आजही आम्ही महायुतीमध्ये भक्कमपणे एकसोबत आहोत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप पक्षाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मानाचे स्थान दिले आहे. त्याच प्रमाणे केंद्रात देखील त्यांना मानाचे स्थान आहे. राज्यसभा, विधानसभा आणि केंद्रीय मंत्रिमंडळात आम्हाला योग्य ती वागणूक मिळत असून आम्ही भक्कमपणे महायुतीत सामील आहोत. असे म्हणत अमोल मिटकरींनी सकाळी केलेल्या आपल्या वक्तव्यावरून आता घुमजाव केले आहे.


तर महायुती आधिक भक्कम होईल


विधानसभेच्या अनुषंगाने एका पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारला. यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही आगामी निवडणुकांसाठी सोबत आल्यास आपली भूमिका काय, अशी विचारणा केली. यावेळी मी त्यांना उत्तर दिलं की, काँग्रेस पक्षाने वेळोवेळी बाबासाहेबांचा अपमान केला आहे. तसेच वंचितचे सर्वेसर्वा असलेले प्रकाश आंबेडकर यांना देखील महाविकास आघाडीने अपमानाचे स्थान दिले आहे.  प्रकाश आंबेडकर  हे फार मोठं नाव या महाराष्ट्रातला आहे.  त्यामुळे ते जर महायुतीमध्ये आले तर महायुती आधिक भक्कम होईल आणि मागासवर्गीय लोकांना देखील त्यांचे न्याय या माध्यमातून मिळेल. या भावनेतून मी ते वक्तव्य केले असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या