अकोला : शहरातील बळवंत कॉलनी येथील वृद्ध दाम्पत्याच्या झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासांतच प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना बेड्या ठोकल्या आहे. आज (दि. 5 जून) सकाळी नथ्थूराम भगत आणि त्यांची पत्नी हेमलता यांचे मृतदेह घरात जळालेल्या स्थितीत आढळले होते. हत्या झालेले नथ्थूराम भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आहे. भगत यांच्या घरातील भाडेकरू महिलेनंच चोरीच्या उद्देशानं भावाच्या मदतीनं या दाम्पत्याची हत्या केली.


आरोपी महिला भाडेकरू महमुदाबी परवीन वसीम आणि तिचा भाऊ मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा यांना शुक्रवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दोन्ही आरोपींकडून 5.72 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


घरातील भाडेकरू महिलेकडून हत्याकांड 
अकोला शहरातील बळवंत कॉलनी येथे 5 जून रोजी पहाटेच्या सुमारास वृद्ध दाम्पत्यांच्या हत्येनं हादरून गेली. बळवंत कॉलनी येथे 83 वर्षीय सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथ्थूराम भगत आणि त्यांची 75 वर्षीय पत्नी हेमलता राहत होते. भगत यांचा मुलगा बँगलोर येथे राहतो. तर एक मुलगी सोलापूरला तर दुसरी अकोल्यात राहते. आज सकाळी भगत यांच्या घरातून भाडेकरू आणि शेजाऱ्यांना धूर निघताना दिसला. यावेळी दरवाजा आतून लावून असल्यानं दरवाजा तोडण्यात आला. मात्र, आतलं दृश्य अतिशय धक्कादायक होतं. दोन पलंगावर नथ्थूराम आणि त्यांची पत्नी हेमलता अर्धवट जळालेल्या स्थितीत पडलेले होते. यातच या दोघांचाही मृत्यू झाला होता. यावेळी अकोल्यात राहत असलेली मुलगी वंदना पाढेन यांना आपल्या आईच्या अंगावरचं सोनं गायब दिसलं. तिथंच त्यांच्या मनात आई-वडिलांच्या मृत्यूबाबत शंका निर्माण झाली.


नागपुरात तरुणाच्या आत्महत्येवरुन राजकारण; अ‍ॅट्रोसिटीसह हत्येचा गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी
पोलिसांनीही परिस्थितीजन्य पुराव्यावरून तपासाची चक्रं फिरवलीत. भाडेकरू असणारी महमुदाबी परवीन वसीम हिचं वागणं पोलिसांना संशयास्पद वाटलं. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शैलैंद्र सपकाळ आणि चमूनं वेगानं तपास करीत महमुदाबीचा भाऊ मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा याला अटक केली. अन् या संपुर्ण 'मर्डर मिस्ट्री'चा पर्दाफाश झाला. दोन्ही आरोपींनी या दाम्पत्याची हत्या करून त्याला अपघाताचं रूप देण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही आरोपींनी भगत यांच्या घरातील चोरलेलं सोनं आणि रक्कम पकडून 5 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.


भगत दाम्पत्यांना आरोपी महिलेवरचा अतिविश्वास नडला
या हत्याकांडातील मुख्य आरोपी ही नथ्थूराम भगत यांच्याकडे भाड्यानं रहात होती. तिनं भगत दाम्पत्याचा यादरम्यान मोठा विश्वास कमावला होता. तिला भगत यांच्याकडच्या पैसे आणि दागिन्यांबद्दल बरीच माहिती होती. यादरम्यान तिनं जूने शहर भागातील इस्लामपुरा भागातील भाऊ मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा याच्यासोबत संधान साधत भगत यांच्याकडे चोरीचा कट केला. अन् या कटातूनच या दोघा बहिण-भावांनी भगत दाम्पत्याची हत्या केली. या दाम्पत्याच्या हत्येनं अकोल्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Chandrapur Crime | चंद्रपुरात दारु तस्करांचा पोलीस उप-निरीक्षकावर जीवघेणा हल्ला