पिंपरी-चिंचवड : निसर्ग चक्रीवादळाने कोकणासह पुणे जिल्ह्याचे ही मोठे नुकसान केले. त्यामुळेच पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज नुकसानग्रस्त दौरा केला. बुधवारी चक्रीवादळाने हैदोस घातला, अक्षरशः नागरिक मेटाकुटीला आले. या प्रकोपाला दोन दिवस उलटले तरी ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच पंचनामे झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील दौऱ्यात एका अधिकाऱ्यांचाच दादांनी त्यांच्या खास शैलीत 'पंचनामा' केला. दोन दिवसांत पंचनामे होणे अपेक्षित होतं असं ही खडसावले.


निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या मावळ तालुक्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दौऱ्याची सुरुवात केली. तालुक्यात साडे तीनशे एकरवर पॉली हाऊसमध्ये गुलाब उत्पादन केलं जातं. यामध्ये दोनशे एकरावरील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात दोन शेतकऱ्यांच्या नुकसानीची अजित पवारांनी पाहणी केली. तेव्हा ही अधिकाऱ्यांनी 'केवळ पंधरा शेतकऱ्यांचे पंचनामे' झाल्याची माहिती दिली. तर अन्य शेतकऱ्यांनी पंचनामे न झाल्याने दादांसमोर उघड नाराजी व्यक्त केली. दादांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि ते खेड तालुक्याकडे रवाना झाले. तिथं ही शेतकऱ्यांनी पंचनामे न झाल्याच्या तक्रारीचा सूर धरला. कोरोनाची महामारी सुरू असल्याने अधिकाऱ्यांवर कामाचा ताण आहे. ही बाब लक्षात घेत तिथं ही दादांनी थोडा अधिकाऱ्यांकडे कानाडोळा केलाच, पण पंचनामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना मात्र दिल्या.


मग अजित दादांनी जुन्नर तालुक्याकडे कूच केली. एका महिलेच्या घराचे छप्पर उडाले होते, नुकसानग्रस्त महिला दादांसमोर टाहो फोडत होती. त्या महिलेला धीर दादांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. वादळाच्या प्रकोपाने परिस्थिती गंभीर केल्याचं दादांना पावलोपावली जाणवत होतं. तेव्हा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकसानग्रस्त महिलेची माहिती रिपोर्ट करुन घ्या अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, पण उपस्थित एका अधिकाऱ्यांची तेथील शैली अजित पवारांना काही पटली नाही. आधीच दोन तालुक्यातील अनुभव त्यांच्या गाठीशी होता. कोरोनाचा ताण अधिकाऱ्यांवर आहेच पण वादळानंतरच्या परिस्थितीचं गांभीर्य तिथंल्या अधिकाऱ्यांमध्ये जाणवलं नाही. मग काय दादांनी त्यांच्या शैलीतच संबंधित अधिकाऱ्यांचा जागीच पंचनामा केला. "आत्ता आलात तर नुकसानग्रस्तांची माहिती घेऊनच पुढे जा, दोन दिवसात पंचनामे झाले पाहिजेत. यांचीच माहिती घ्यायला पुन्हा यायचं म्हणजे किती वेळ वाया जाणार"? असे म्हणत अजित पवारांनी त्यांच्या शैलीतच संबंधित अधिकाऱ्यांना शालजोडे लगावले. तसेच उद्या म्हणजे शनिवारी पुण्यात होणाऱ्या बैठकीत कोण-कोण उपस्थित असणं आणि त्यांच्याकडून कोणती माहिती अपेक्षित आहे. याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात आल्या.


कोरोनाच्या महामारीत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी गेली तीन महिने रात्रंदिवस झटत आहेत. हे कोणीच नाकारणार नाही. पण निसर्ग चक्रीवादळाने भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अशावेळी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचं भान राखून नुकसानग्रस्थांना आधार द्यायला हवा.


Ajit Pawar | वादळामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करु, वीजेचे खांब पुन्हा उभारु : अजित पवार