मुंबई : लॉकडाऊनमध्ये आता पाळीव प्राण्यांना घेऊन घराबाहेर फिरण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी ही माहिती महाधिवक्तांनी दिली. राज्य सरकारने यासंदर्भात 1 जून रोजी एक परिपत्रक रोजी जारी केले असून पाळीव प्राण्यांना थोड्या अवधीसाठी बाहेर नेऊन फिरवण्याची परवानगी दिली आहे. पोलीस आणि पालिका प्रशासनालाही याबाबत निर्देश देण्यात आले असून अशा नागरिकांना प्रतिबंध करु नये, असं त्यात स्पष्ट केले आहे, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली.


पाळीव प्राण्यांना बाहेर घेऊन जाण्यासाठी सध्या बंदी असल्यामुळे पुण्यातील सामाजिक कार्यकत्या विनिता टंडन यांनी अॅड. हर्षवर्धन भेंडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेले परिपत्रकही यावेळी हायकोर्टात दाखल करण्यात आले.


भारतीय प्राणी विकास महामंडळाच्यावतीने याबाबत एक नियमावली नुकतीच जाहीर केली आहे. याच पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने संबंधित परिपत्रक जारी केले आहे. यानुसार आता पाळीव प्राण्यांना निर्धारित वेळेत बाहेर नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांच्या फिरण्यावर बंदी आणली असून या नियमांमध्ये स्पष्टता नाही, असा याचिकादारांचा दावा आहे. त्यामुळे राज्य आणि केन्द्र सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयानं गेल्या सुनावणीत दिले होते. तसेच लॉकडाऊनच्या काळात पाळीव प्राण्यांना उपचारासाठी नेणाऱ्या रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांनाही अडवू नका, असेही निर्देश न्यायालयाने यापूर्वीच दिलेले आहेत.