जालना : जालना जिल्ह्यातील मंठा येथे पाच दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका विवाहित तरुणीची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वैष्णवी इंगळे (वय 19) असे या मृत तरुणीचे नाव आहे. मंगळवारी मंठा शहरातील बाजार पट्ट्यात मृत तरुणी आपल्या मैत्रिणीसह खरेदीसाठी गेली होती. साधारण चार वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या आरोपीने धारदार चाकूने हल्ला करत तरुणीचा गळा चिरला. बेसावध असलेली तरुणी जागीच कोसळली मैत्रिणीने मदतीसाठी आरडाओरड केली. दरम्यान, तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी तपास सुरु केला. प्रत्यक्षदर्शींच्या महितीनुसार, मृत तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तिच्याच घराजवळ राहणाऱ्या शेख अल्ताफ शेख बाबू या 26 वर्षाच्या तरुणाचे नाव पुढे आले. तरुणाची माहिती घेऊन त्याची शोधाशोध सुरु केली. संध्याकाळी एका शेतात लपून बसलेल्या या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. सदर आरोपीच्या ताब्यातून एक चाकू देखील पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान अटकेच्या भीतीने आरोपीने विष प्राशन केले असून त्याच्यावर जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मृत तरुणीचे 5 दिवसांपूर्वी जालन्यातील एका तरुणाबरोबर विवाह झाला होता. मांडव परतणीसाठी ही तरुणी दोन दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. मंगळवारी तरुणी आपली आई आणि मैत्रिणीसोबत खरेदीसाठी बाजारात आली होती. मात्र काही वेळाने तिच्यासोबत असलेली आई परत घरी गेली होती. हिच संधी साधत आरोपीने तरुणीचा काटा काढला. पोलिसांनी मृत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात मंठा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सदर आरोपी शाळेत असल्यापासून तरुणीच्या मागे होता. दरम्यान तिचे लग्न झाल्याने एकतर्फी प्रेमातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या खळबळजनक प्रकाराने कालपासून शहरात तणावाचे वातावरण असून, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मुंबईतील जे.जे रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड; आरोपी वॉर्डबॉयला अटक
दहशत कायम राहावी म्हणून युवकाला नग्न करून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
बारामतीत मुलगी झाली म्हणून नवऱ्याची महिलेला रुग्णालयात शिवीगाळ करत मारहाण!
गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; रस्त्यावर पळवत महिलेची हत्या