मुंबई : कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टर आरोग्य सेवक यांना कोरोना योद्धा म्हणून पाहिलं जात आहे. मात्र जे.जे रुग्णालयातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जे.जे रुग्णालयातील एका महिला ट्रेनी डॉक्टर बरोबर तिथल्याच एका वॉर्डबॉयने छेडछाड केल्याचं प्रकरण समोर आल आहे. वॉर्डबॉयच नाव गजेंद्र गोसावी असून तो 30 वर्षाचा आहे.

जे.जे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीची घटना आहे. महिला डॉक्टर वार्ड मध्ये राउंडला जात होती त्यावेळी वॉर्डबॉय मागून आला आणि त्याने महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने आरडाओरडा सुरू केला ज्यानंतर वार्डबॉय तिथून पळाला.

या घटनेबद्दल महिला डॉक्टरने आधी आपल्या जे.जे रुग्णालयातील सहकार्‍यांना सांगितलं. त्यानंतर वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर या महिलेने जेजे पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली.



पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करून वॉर्डबॉयचा शोध सुरू केला आणि त्याला अटक केली. वॉर्ड बॉय गजेंद्र गोसावी  विरोधात आईपीसी कलम 354,354(D),आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गजेंद्र गोसावी विरोधात रुग्णालयातून आधीसुद्धा अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी भांडण, मारहाण, शिवीगाळ करने अशा विविध प्रकारच्या तक्रारी गजेंद्र गोसावी विरोधात करण्यात आले आहेत.

गजेंद्र गोसावीवर अजून कुठे गुन्हे दाखल आहेत याचा तपास ही मुंबई पोलीस करत आहे. पोलिसांनी गजेंद्र गोसावी याला कोर्टात हजर करून कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. तर जे.जे रुग्णालय प्रशासनाकडून ह्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून अशा घटना भविष्यात घडू नये याची दक्षता ते घेत आहेत.