वर्धा : पत्नीवर वाईट नजर ठेवून असलेल्या मित्राची पतीने मित्राच्या मदतीने दगडाने ठेचून हत्या केलीय. वर्धा जिल्ह्यात सोनेगाव शिवारात दोन दिवसांपूर्वी अनोळखी मृतदेह सापडलेल्या प्रकरणाच्या तपासात ही बाब पुढे आली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 48 तासांच्या आतच दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.


अविनाश फुलझेले असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सुधीर जवादे आणि निखील ढोबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मृतक आणि मारेकरी हिंगणघाटचे रहिवाशी असून मजुरी करतात. हिंगणघाट रस्त्यालगत सोनेगाव (स्टेशन) शिवारातील शेतात अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून विद्रुप केलेला मृतदेह आढळला होता. प्रकरणाच्या तपासादरम्यान हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री वॉर्डातील अविनाश फुलझेले हा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोनेगाव शिवारातील मृताची ओळख अविनाश फुलझेले असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली.


तपासादरम्यान सुधीर जवादे आणि निखील ढोबळे या दोघांनी अविनाशची दगडान ठेचून हत्या केल्याचं उघडकीस आलं. अविनाश आरोपींपैकी एकाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत अश्लिल संवाद साधल्याच्या कारणातून ही हत्या घडल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. मद्य प्राशन केल्यानंतर सुधीरने निखीलच्या मदतीने अविनाशची दगडानं ठेचून हत्या केली.


पत्नीवर वाईट नजर ठेवल्यानं घडलेल्या या हत्याकांडानं परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. विद्रुप चेहरा असलेल्या मृताची ओळख पटवत अवघ्या 48 तासांच्या आत प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेनं यश मिळवलं आहे.