Rain Live Update | पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नदी, नाले भरून वाहायला सुरुवात
मुंबईमध्ये पावसाचा हायअलर्ट (High alert in Mumbai) देण्यात आलेला आहे. मुंबईसह (Mumbai Rain Update) काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईसह राज्यातील सर्व ठिकाणच्या पावसाचे प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
06 Jul 2020 07:20 AM
पालघर जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर पकडला असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे काही नाले भरून वाहायला सुरुवात झाली आहे. विक्रमगड मधील तांबडी नदीच्या प्रवाहात वाढ झाल्याने गडदे-विक्रमगड मार्गावरील तांबडी पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी तयार केलेला रस्ता पुरात वाहून गेला .त्यामुळे येथे एक ट्रक अडकून पडला असून तो काढण्याचे काम सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने कामवारी नदीची पातडीत वाढ झाली आहे. तर शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. कामवारी नदीची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या परिसरात प्रसाशनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील बोरघाटात धुक्याची चादर, दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे बोरघाटाच्या डोंगर परिसरात पाऊस, धुक्याचे वातावरण
मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने झोडपायला सुरुवात केली आहे. काल रात्री मुंबईला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मुंबईत साडेबाराच्या सुमारास भरती येण्याची शक्यता आहे. सोबतच मुसळधार पाऊस ही बाब लक्षात घेत महापालिकेने 24 विभागांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मालवण तालुक्यातील चिंदर येथे घराचे छप्पर, मातीच्या भिंती कोसळल्या, ठिक ठिकाणी झाडे पडून घरांचे नुकसान नुकसान झालं. जिल्ह्यात आतापर्यंत 1440 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून जिल्ह्यात सर्वच भागात चांगला पाऊस सुरू झाला आहे. अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखवलाय तर जिल्ह्या समोर कोरोनाचे संकट देखील आहे. सध्या जिल्ह्यात 144 लागू असतानाही काही लोक कायद्याचे उल्लंघन करून पर्यटनासाठी वाहत असलेले धबधबे, धरण, तलाव, झरे, समुद्र किनारे, नद्या, नाले या ठिकाणची वाट धरतात आणि धोका पत्करतात.अशाच घटनेतून आताच जव्हार मध्ये 5 बळी ही गेले याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी कडक धोरण अवलंबलं असून अशा पर्यटन स्थळांवर गर्दी केल्यास कलम 144 नुसार कडक कारवाई करण्याचा आदेश काढला आहे,,
काल दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबापुरीचा वेग मंदावल्याचं पाहिला मिळालं. हवामान खात्याच्या वतीने तीन दिवसांपुर्वी ऑरेंज अलर्ट जाहिर केला होता तर काल रेड अलर्ट जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार मागील दोन दिवस मुंबईला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल रात्री 8.30च्या तब्बल 132 मिमी पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेलामुळे तलाव क्षेत्रात केवळ 7 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचं दोन दिवसांपुर्वी समोर आलं होतं. परंतू आता शुक्रवार रात्रीपासूनच तलाव क्षेत्रात देखील पावसाने आपलं खातं उघडलं आहे. आज मुंबईत साडे बाराच्या सुमारास समुद्रात हाय टाईड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनकडून सर्व 24 विभागांना अलर्ट जारी केला आहे.
कोस्टल रोडच्या कामामुळे पाणी साचू नये यासाठी महापालिकेकडून कोस्टल रोडसाठी विशेष 3 नियंत्रण कक्ष तयार, 'सागरी किनारा रस्ता' प्रकल्पाचे तीन 'नियंत्रण कक्ष' कार्यान्वित*
,प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान व वरळी डेअरीजवळ नियंत्रण कक्ष,
मनपा मुख्य नियंत्रण कक्षाच्या '१९१६' या दूरध्वनीवरही करता येणार तक्रार
सिंधुदुर्गात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. कणकवलीत महामार्गाच्या धोकादायक भिंतीजवळ सर्व्हिस मार्गाच्या भिंतीला भगदाड पडले असून या ठिकाणी मार्ग वाहतुकीला धोकादायक झाला आहे. जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविला आहे. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तळकोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यावर्षी दशकातला सर्वाधिक पाऊस आंबोलीत कोसळला आहे. आंबोली हे ठिकाण महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखली जाते. ज्या पद्धतीने देशात सर्वाधिक पाऊस चेरापुंजी त पडतो तसाच पाऊस दरवर्षी आंबोलीत पडतो. याहीवर्षी आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आंबोलीत पडला आहे. 1 जून पासून आतापर्यंत 70 इंच पाऊस आंबोलीत पडला आहे. म्हणजे साधारणपणे 1700 ते 1800 मी. मी. पेक्षा जास्त पाऊस आंबोलीत पडला आहे. त्यामुळे याठिकाणी लहान मोठे धबधबे या आंबोलीच्या घाटात प्रवाहित झालेले पाहायला मिळतात. खरंतर आंबोली हा जैवविविधतेणे संपन्न असा प्रदेश आहे. आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे दाट धुकं असल्याने घाटात प्रवास करताना गाडीच्या लाईट इंडिकेटर लावून प्रवास करावा लागत आहे. समुद्र सपाटीपासून 2500 फूट उंच असलेलं आंबोलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळ बंद असल्याने आंबोलीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी भरती होणार आहे. महापौरांना ताप आल्यानंतर त्यांची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.
पर्यटकांना खुनावणारा लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालाय. पण पर्यटनासाठी इथं बंदी असल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. यंदा आज सकाळपर्यंत 649 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. सकाळपासून पावसाने आणखी जोर धरल्याने धरणाचे पाणी पायऱ्यांवरुन ओसंडून वाहू लागलंय. याच पायऱ्यांवर बसून पर्यटक पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असतात. पण यंदा कोरोनामुळं या आनंदावर विरझन पडलेलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता नदी, धरणं यांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली दिसून येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण महिनाभरातच पूर्ण क्षमतेने भरलं असून यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून त्या अद्यापही सुरुच आहेत. धरणाची क्षमता 126.15 मीटर असून आजघडीला गडनदी धरणातील पाण्याची पातळी ही 120.55 मीटर इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात संगमेश्वरमध्ये 68 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आता मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल मध्यरात्रीपासून रत्नागिरीत जोरदार पाऊस बरसतोय.त्यामुळं इथल्या नद्या दुथडी भरुन वाहताहेत. तर धरणं देखील ओव्हफ्लो झालीत. रत्नागिरी जवळची काजळी नदी देखील आता दुथडी भरून वाहत आहे. कोकणात 4 आणि 5 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. आयएमडीने दिलेल्या हवामान अंदाजानुसार ठाणे, पालघर तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे
वर्धा : दोन दुर्दैवी घटनेत चौघांचा मृत्यू , नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू , एक घटनेत दोन महिला तर दुसऱ्या घटनेत 12 वर्षाच्या नातवासह आजोबाचा मृत्यू, शुक्रवारी संध्याकाळी शेताचे कामे आटोपून कामावरून परत जात असताना घडली घटना, नाल्याला अचानक पूर आल्याने काही पुरुष मजूर आणि महिला बैलबंडीच्या सहाय्याने रस्ता पार करत होते, अचानक बैल बंडी नाल्याच्या पुलावर फसल्याने दोन महिला पाण्याच्या प्रवाहात वाहू गेल्याने मृत्यू, सोनेगाव स्टेशन येथील चंद्रकला लोटे आणि तळेगाव टालाटूले येथील बेबी भोयर अशी मृतकाचे नाव, रात्री उशिरा आढळले मृतदेह, दुसऱ्या घटनेत सकाळी येरणगाव गोजी मार्गावरील नाल्यात गोजी शिवारात 12 वर्षीय मुलाचा आणि त्याचा आजोबाचा आढळला मृतदेह,
धोत्रा येथून सावली सासताबाद येथे जात असताना येरणगाव गोजी नाल्यात प्रवाह जास्त आल्याने आजोबा आणि नातू बैलगाडीसह वाहून गेले, सकाळच्या सुमारास बैलबंडीसह मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. कालपासून जिल्ह्यात कोसळणार पाऊस हा सरींवर होता. पण, आता मात्र जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागानं अंदाज वर्तवला असला तरी जोरदार पाऊस जिल्ह्यात कोसळत नव्हता. पण, आता मात्र जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आता नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत देखील हळूहळू वाढ होताना दिसत आहे.
सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी समुद्रात भरती येण्याची शक्यता आहे. यावेळी जवळपास साडेचार मीटर पर्यत लाटा उसळण्याची शक्यता आहे. ज्यावेळी मुसळधार पाऊस आणि त्याच वेळी भरतीची वेळ असेल तर अशा वेळी समुद्राला मिळणारे नाल्याचे तोंड बंद केले जाते आणि त्या ठिकाणी असलेले पाणी वर उचलून मग समुद्रात टाकले जाते. भरती येण्याआधी नाल्याचे तोंड बंद केले गेले नाही तर मग समुद्राचेच पाणी शहरात घुसण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेता ज्याठिकाणी पावसाचे पाणी भरते तिथे आता महापालिका प्रशासनाकडून कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. यासोबतच एनडीआरएफ, आपतकालीन विभाग यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड :
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला,
किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाची हजेरी,
अलिबाग , मुरुड , श्रीवर्धन , म्हसळा तालुक्यात पावसाचा जोर,
सखल भागात पाणी साचायला सुरुवात ,
गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 60.98 मिलिमीटर पावसाची नोंद,
पुढील दोन दिवस जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता,
नागरिकांना सतर्क राहण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सुचना,
तळकोकणाला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला आहे. आंबेरी पुलावरुन पाणी वाहत असल्याने कामावर जाणाऱ्याचा खोळंबा झाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने बळीराजा चिंतेत आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : भारतीय हवामान विभागामार्फत काल 4 जुलैपासून मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी 4.5 मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती समुद्रात असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीतील सर्व 24 विभाग कार्यालयासह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क, सुसज्ज आणि कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती विषयक परिस्थितीचा अंदाज घेत सर्वच यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.
महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभाग कार्यालयांना सतर्क, सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने सर्व विभाग नियंत्रण कक्षांना ‘हाय अलर्ट’ देण्यात आले असून मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
पर्जन्य जलवाहिन्या विभागाची 6 उदंचन केंद्रे सुसज्ज असून 299 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील, याचीही खातरजमा करण्यात आली आहे. या अनुषंगाने आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बृहन्मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह 6 प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठी असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या 3 तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत पावसाचा हायअलर्ट, हायटाईडमुळे समुद्रात 15 फुटांपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता
भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना त्वरीत मदतीकरिता तत्पर रहाण्यास सांगण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विद्युत पुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमासह इतर विद्युत वितरण कंपन्यांना त्यांच्या पथकांसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संभाव्य अतिवृष्टी आणि त्याच वेळी असणारी मोठी भरती याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सर्व भ्रमणध्वनी कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सतर्क करणारे संदेश SMS पाठविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व पर्यायी बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले असून त्यानुसार नियोजनात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे.