Mumbai Crime News : मुंबईच्या (Mumbai) बेस्ट बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी (Mobile Theft) करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पण कांदिवली पोलिसांनी (Police) या चोरट्यांना रंगेहात पकडत अटक केली आहे. कांदिवली पश्चिम परिसरात बेस्ट बसमध्ये (BUS) हा प्रकार घडत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या चोरांमुळे नागरिकांना खूप त्रास होत असल्याचं सांगण्यात येत होतं. तसेच अनेक जणांचे फोन या गर्दीमुळे चोरीला गेले होते. त्यामुळे फोनमधील महत्त्वाची माहितीचा चुकीचा फायदा घेण्याची भीती देखील नागरिकांना वाटत होती.
पण रविवार (6 ऑगस्ट) रोजी कांदिवली पश्चिम परिसरात बस क्रमांक 277 चोरीचा प्रकार घडला. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन हे चोरटे फोन चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. विशेष म्हणजे हे चोरटे चोरीच्या फोनची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या मालवणी परिसरात मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचे दुकान सुरु केले होते. यामुळे या चोरट्यांचा सुळसुळाट या परिसरात झाला होता. त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न करण्यात येत होते. पण अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले.
या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये सलीम रईस शेख (24 वर्ष ), अल्ताफ तुरब अली रूपाणी (44 वर्ष), शहाद इसाफ खान (43 वर्ष), रमजान बाबामिया लांजेकर (51 वर्ष) आणि हमीद अहमद खान (42 वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत. नागरिकांना या चोरट्यांमुळे गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या मौल्यवान वस्तू सांभाळणे कठिण झाले होते. कांदिवलीच्या या परिसरात बसमध्ये नेहमीच वर्दळ असते. अशा वेळी गर्दीचा फायदा घेणं या चोरट्यांच्या सोयीचं झालं होतं.
या टोळीने मुंबईच्या मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या परिसरात चोरीचं सत्र सुरु केलं होतं.या परिसरात गर्दीचा फायदा घेऊन ही टोळी मोबाईल चोरी करायची. दरम्यान पोलिसांनी यांच्याकडून एकूण 74 मोबाईल हस्तगत केले आहेत. तर या मोबाईलची किंमत ही जवळपास 7 लाख 35 हजार इतकी आहे. सध्या या पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या टोळीमध्ये आणखी कोणी सक्रिय आहे का हे पाहणं गरजेचं आहे. तसेच या संदर्भात पोलिसांकडून अधिक तपास देखील करण्यात येत आहे. त्यामुळे आता तरी गर्दीचा फायदा घेणाऱ्या या चोरट्यांना आळा बसणार का हा सवाल उपस्थित केला जात आहे.