मुंबई : भारतीय लष्करातील जवान भूपेंद्र सिंग ओमप्रकाश टोकस (वय 31) यांच ट्रेनने धडक दिल्यामुळे निधन झालं ही घटना मिरा रोड ते दहिसरच्या दरम्यान रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. भूपेंद्र सिंग ओमप्रकाश टोकस हे 30 नोव्हेंबर पासून बेपत्ता होते आणि या संदर्भात मुंबईच्या कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.


रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक इसम रविवारी रात्री दहिसर ते मिरा रोड दरम्यानचा रेल्वे रूळ क्रॉस करत होता. वसई रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली की एका व्यक्तीला ट्रेन ने धडक दिली आहे. त्यानंतर तात्काळ वसई रेल्वे पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्याने जखमी अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीला रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात  पोहोचल्यावर डॉक्टरने त्या व्यक्तीला मृत घोषित केलं.


भारतीय सैन्यात टोकस हे लुधियाना युनिट मध्ये कार्यरत होते. मुंबईमध्ये पेट्रोलियम टेक्निशियनचा कोर्स करण्यासाठी टोकस मुंबईत आले होते. 30 नोव्हेंबर रोजी कोणालाही न कळवता कुलाब्याच्या नेव्हीनगर मधून टोकस निघाले. त्यानंतर टोकस घरी परतले नाही म्हणून त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली. पोलिसांनी सुद्धा टोकस यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. टोकस यांचा मोबाईल मात्र बंद होता. टोकस यांचा ट्रेन अपघातात मृत्यू झाल्याची माहिती कफ परेड पोलिसांना वसई रेल्वे पोलिसांनी कळवली.


जवान भूपेंद्र सिंग ओमप्रकाश टोकस हे 30 नोव्हेंबर पासून बेपत्ता होते. त्यांनी त्यांचा मोबाईल सुद्धा बंद केला होता. काही वेळेसाठी त्यांनी दुसरे सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकून त्याचा वापर केला होता. मात्र नंतर तो सुद्धा बंद केला, ज्यामुळे वसई रेल्वे पोलीस इतर बाबींच्या अनुषंगानेसुद्धा तपास करत असल्याची माहिती त्यांनी दिली.


भूपेंद्र सिंह ओमप्रकाश टोकस हे राजस्थानमधील अल्वर तालुक्यातील हरसोली गावातील राहणारे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत. टोकस हे 30 नोव्हेंबरपासून कोणालाही न सांगता कुठे गेले होते? टोकस यांनी मोबाईल का बंद केला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांकडून तपासली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या :