मुंबई : कोरोनाची चाचणी आता आणखी स्वस्त झाली आहे.  कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 350  रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.


राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे. आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 350 रुपयांत  चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक आहे. 


कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास 350 रुपये आकारले जाणार आहेत. कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 500 रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास 700 रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.


अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 200, 250 आणि 350 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 300, 400, 500 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 100, 150 आणि 250 असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.


महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णाची संख्या 8 वर


शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला होता. यामध्ये आता पुण्यातील 7 रुग्णांची भर पडली आहे. रविवारी पिंपरी चिंचवडमधील 6 तर पुण्यात एका रुग्णाची भर पडली आहे. पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.