मुंबई : साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. 2 महिन्यांनी या याचिकेवर सुनावणी घेत हायकोर्टाने उदयनराजे भोसलेंना दिलासा देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.


लोणंद येथील सोना अलाईज या कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच 9 जणांना अटकही करण्यात आली.

संबंधित बातमी : ...तर उदयनराजेंना अटक करु: विश्वास नांगरे-पाटील

तक्रारदाराने दिलेल्या माहीतीनुसार त्यांच्या कंपनीशी संबंधित एका प्रकरणात उदयनराजे भोसलेंनी त्यांच्याकडे खंडणी मागितली. नकार देताच उदयनराजेंनी त्यांना मारहाण केली तसेच त्यांच्याकडील पैसे आणि संबंधित कागदपत्रही जबरदस्तीने काढून घेतली.

याप्रकरणी 12 एप्रिलला सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसलेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर उदयनराजेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्यानंतर उदयनराजेंकडे केवळ सुप्रीम कोर्टाचा पर्याय शिल्लक आहे. मात्र तूर्तास उदयनराजे भोसलेंना याप्रकरणात कधीही अटक होऊ शकते.

घटनेमागची राजकीय पार्श्वभूमी

खरंतर या प्रकरणाला राजकीय वादाचीही किनार आहे. जैन यांच्या कंपनीत कामगारांच्या दोन युनियन कार्यरत आहेत. एक उदयनराजेंच्या नेतृत्त्वाखाली तर दुसरी राम राजे निंबाळकर यांची. निंबाळकरांच्या युनियनला भोसलेंच्या युनियनपेक्षा जास्त मोबदला दिला जातो अशा तक्रारी आल्यामुळे उदयनराजे भोसलेंनी जैन यांना 18 फेब्रुवारी रोजी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात बोलावलं होतं. जिथं हा प्रकार घडला.

संबंधित बातम्या 

साताऱ्यात उदयनराजेंवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल 

उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता