मुंबई : मुंबईसह कोकणात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम असतानाच, येत्या 24 तासात तो आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.
त्याचसोबत मराठवाड्यालाही दिलासा मिळणार आहे, कारण येत्या 72 तासांत मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तिकडे विदर्भातही येत्या 48 तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने जोरदार धरला आहे. साताऱ्यातील कोयना आणि महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. तर कोल्हापुरातही मुसळधार पाऊस होत आहे. राधानगरीसह सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
पावसाने कोकणाला झोडपलं
मुसळधार पावसाने कोकणालाही झोडपून काढलं आहे. रत्नागिरीमध्ये चिपळुणच्या कापसाळ गावातील रस्त्यावर पाणी साचलं आहे. तर संगमेश्वरजवळच्या माखजण बाजारपेठेच्या सखल भागात पुराचं पाणी साचलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवला.
तर रायगड जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पाली जवळच्या अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसंच सावित्री नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीमध्ये अंकुर महिला केंद्रावर झाड कोसळलं होतं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. तर कुडाळ तालुक्यातील आंबेरीतील निर्मला नदीवर पूर आल्यामुळे बराच वेळ माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. अजूनही माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे बीएसएनएलची सेवा कोडमडली आहे.
विदर्भातही दमदार पाऊस
तिकडे विदर्भातही पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भाच्या 11 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस बरसला आहे. गडचिरोलीत वैरागड येथील वैलोचना नदीचं पाणी पुलावरुन वाहू लागली आहे. दुसरीकडे गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. इतकंच नाही तर नगरपालिकेतही पाणी भरलं आहे. त्यामुळे 150 गावांचा संपर्क तुटला आहे.
भामरागडमधील पर्लकोटा नदी दुथडी भरुन वाहत आहे. नागपुरातही अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं चित्र दिसत आहे. मनीष नगर आणि बेलतरोडी भागात पाणी साचलं आहे.
चंद्रपुरातील ब्रम्हपुरी, नागभीड आणि सिंदेवाही या तीन तालुक्यात पावसाने हजेरी लावली. मात्र इतर भागात पावसाची प्रतीक्षा कारवी लागणार आहे.
गोव्यातील जनजीवन विस्कळीत
गोव्यात काल सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. नद्या नाले दुथडी भरुन वाहत आहेत. राजधानी पणजीसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचीही कोंडी झाली. ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने नुकसान झालं आहे. एकंदरीत जोरदार पावसामुळे गोव्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
गुजरातला पावसाचा तडाखा
गुजरातलाही जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गुजरातमधील वलसाड आणि नवसारीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांना नद्याचं रुप आलं आहे. तर घराघरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झालं आहे. मुसळधार पावसाचा परिणाम गुजरातमधील रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे.