मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेधारकांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी पुन्हा एकदा नकार दिला आहे. वैद्यकीय गरजा, मुलांचे दाखले किंवा अन्य आपत्कालीन कारणास्तव जर खातेधारकांना तातडीने जास्त पैसे हवे असतील तर त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या प्रशासकांकडे अर्ज करावा, असे निर्देश न्यायालयानं दिलेत. रिझर्व्ह बँकेच्यावतीनंही सांगण्यात आलं आहे की आरबीआयच्या एका निवृत्त अधिकाऱ्याची पीएमसी बँकेच्या प्रशासकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी थेट आरबीआय या घोटाळ्यात सामील असल्याचा गंभीर आरोप केला. ज्याचे पडलाद सुनावणी संपल्यानंतर कोर्टाच्या परिसरात पाहायला मिळाले. संतापलेल्या खातेधारकांनी न्यायालय परिसरात 'आरबीआय चोर है'...चे नारे देत घोषणाबाजी केली. खंडपीठीनं मात्र याचिकाकर्त्यांच्या वकिलांना समज देत आरबीआयचं प्रतिज्ञापत्र आणि आरबीआयचे कायदे नीट अभ्यासून त्यावर 4 डिसेंबरच्या सुनावणीत युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लावले आहेत. गैरप्रकारे कर्ज दिल्यामुळे बँक आर्थिक नुकसानीत आली. या पार्श्‍वभूमीवर खातेदारांच्या पैसे काढण्यावरही बंधने लावण्यात आलेली आहेत. याविरोधात तीन स्वतंत्र याचिकांद्वारे हायकोर्टात संबंधित बंधने हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. सद्या खातेधारकांना पन्नास हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा आहे.

बँकेमधील सुमारे पंधरा वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गैरप्रकारांची आणि हाऊसिंग डेव्हलपमेंट ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड(एचडीआयएल)ला दिलेल्या रकमेची माहिती होती. असे तपासात उघड होत आहे. बनावट खात्यांद्वारे ही रक्कम वळविण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र, याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट झाले की खातेधारकांना अधिक दिलासा देऊ असेही यावेळी आरबीआयच्यावतीनं सांगण्यात आले. या टप्यावर बँकेच्या अधिकारांबाबत सुनावणी घेणे शक्‍य नाही, त्यामुळे विपरित परिणाम होऊ शकतो, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर खातेधारकांनी मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात हजेरी लावली होती. यामुळे न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. सुनावणी संपल्यानंतर खातेधारकांनी न्यायालयाच्या परिसरात घोषणाबाजी करत रिझर्व्ह बँकेच्या विरोधात आंदोलन केले.

संबंधित बातम्या -

पीएमसी बँक घोटाळा | अटकेत असलेल्या राजनीत सिंहच्या घराची दोन तास झडती

PMC BANK SCAM | पीएमसी बँक घोटाळ्यात पहिलं राजकीय कनेक्शन उघड, माजी भाजप आमदाराच्या मुलाला अटक

PMC Bank Fraud : खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा वाढून 50 हजारांवर, एटीएम सुविधा सुरु