सत्तास्थापनेचा सस्पेन्स कायम, संजय राऊत म्हणतात सरकार बनवायला वेळ लागेल
एबीपी माझा वेबटीम | 19 Nov 2019 08:10 PM (IST)
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबद्दलचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारणा केल्यास, राऊत म्हणाले की, सरकारस्थापनेस अजून थोडा वेळ लागेल.
मुंबई : अनेक बैठका आणि चर्चांनंतरही महाराष्ट्रात अद्याप कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन केलेले नाही. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सरकारस्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात महाशिवआघाडीचं (शिवसेना + काँग्रेस + राष्ट्रवादी) सरकार येणार, अशी चर्चा सुरु आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका सुरु आहेत. परंतु त्या बैठकींमधून अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतरही दोन्ही पक्षांनी अद्याप कोणताही फैसला केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबद्दलचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारणा केल्यास, राऊत म्हणाले की, सरकारस्थापनेस अजून थोडा वेळ लागेल. संजय राऊत म्हणाले की, सरकार बनवण्यास वेळ लागतोच. ही एक सामान्य प्रक्रिया नाही. निवडणुकीनंतर लगेच सरकारस्थापन करण्यातही वेळ लागतो. आता त्याहून अवघड परिस्थिती आहे. राष्ट्रपती राजवटीदरम्यान अनेक वेगळ्या अडचणी समोर येतात. अनेक प्रकियांमधून आम्हाला जायचे आहे. त्यामुळे सरकारस्थापनेस थोडा वेळ लागेल. 24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले. परंतु अद्याप कोणत्याही पक्षाने राज्यात सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. अशा परिस्थितीत राज्यात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. व्हिडीओ पाहा महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होईल : संजय राऊत | नवी दिल्ली