पीएमसी बँकेत घोटाळा झाला तेव्हा जयेश संघानी आणि केतन लकडावाला स्टॅट्युटरी ऑडिटर होते. या घोटाळयात बँकेचे बडे अधिकारी गुंतले आहेत. बँकेत झालेल्या अनियमितता झाकण्यामध्ये जयेश आणि केतन या दोघांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक आणि बँकेच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
4,355 कोटी रुपयांचा हा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले. ज्याचा फटका खातेदारांना बसला. आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले. ज्यामुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली. काही खातेदारांनी आपली आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवली होती. या तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यू सुद्धा झाला.
पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यानंतर पीएमसी बँकेच्या खातेधारकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. कर्जवाटपात अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी राज ठाकरे यांनी हल्लाबोल करत ही बँक बुडण्यामागे भाजपाच्याच लोकांचा हात असल्याचा आरोप केला होता. आज अनेक बँका बुडत असून खातेदारांवर बँकेबाहेर जाऊन रडण्याची वेळ आली आहे. आज एकही व्यक्ती समाधानी दिसत नाही. खातेदार विनवण्या करत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. काही लोकांच्या अडचणी होत्या, कोणाची लग्न होती परंतु त्यांच्याच हक्काचे पैसे त्यांना मिळत नाहीत. पीएमसी बँक बुडाली, त्या बँकेच्या वरिष्ठ पदांवर भाजपाचेच लोक होते, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले होते. यानंतर मुंबईत आलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी घेराव घातला होता.