पंढरपूर : आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिराजवळ एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने प्रशासनाने परिसर सील केला. त्यामुळे परवा होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्याला भाविकांच्या संख्येची मर्यादा आली.


राज्यात सर्वत्र कोरोनाच्या संसर्गामुळे आषाढी यात्रेसाठीच्या पालखी सोहळ्याला शासनाने बंदी घालून केवळ मोजक्या भाविकांसह हेलिकॉप्टरने पादुका नेण्याचा निर्णय घेतला असताना 13 जून रोजी होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत . आळंदी येथील माऊलीच्या मंदिराजवळील एक महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण मंदिर परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे . दरवर्षही प्रस्थानासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक आळंदी येथे येत असतात. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे आधीच प्रशासनाने अतिशय मोजक्या मानकऱ्यांना ऐनवेळी परवानगी देण्याची भूमिका घेतली असताना आता मंदिराजवळील महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण मंदिराभोवती बॅरेगेटिंग करून परिसर बंद करण्यात आला आहे.


आळंदीत माऊली मंदिरालगत महिलेचा कोरोनाने मृत्यू, पालखी प्रस्थान सोहळ्यावर परिणाम



शनिवारी होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळा परंपरेप्रमाणे होणार असला तरी आळंदी मंदिरात चार पुजारी पारंपरिक पद्धतीने प्रस्थानाचे उपचार करून पादुका अरफळकर महाराजांना देतील आणि नंतर 30 जून पर्यंत याच मंदिरातील सभामंडपात पादुका ठेवण्यात येणार आहेत . मंदिर परिसर कॉरंन्टाईन केल्यामुळे 30 जून पर्यंत मंदिर बंद राहील . यंदा कोरोनामुळे आळंदीत सर्व धर्मशाळा मठ बंद केल्याने जर कोणी वारकरी प्रस्थानासाठी बाहेरून आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे खेड प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले आहे . या वर्षी हा सोहळा सर्वच भाविक भक्तांनी घरात बसूनच साजरा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी संजय तेली यांनी केले आहे.