Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे या घाटाचा काही भाग खचला होता. वर्ष झाले तरी हा खचलेला भाग तसाच आहे. सध्या पावसाची रिमझिम सुरु आहे. या पावसात खचलेल्या भागातील माती हळूहळू खाली सरकू लागली आहे. अशा परिस्थितीतही घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे.


गेले काही वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. या अर्धवट आणि धिम्या गतीने सुरु असलेल्या कामाचा फटका महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना चांगलाच बसतोय. त्यात गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परशुराम घाटाचा काही भाग खचला आणि घाट काही दिवस बंद ठेवावा लागला होता. पर्यायी मार्गाने थोडी थोडी वाहतूक वळवण्यात आली पण अवजड वाहने दोन आठवडे बंद ठेवण्यात आली होती.


नंतर तात्पुरत्या स्वरुपाच्या उपाययोजना करुन पुन्हा परशुराम घाट वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला. पण घाट खचतच चालल्याने पुन्हां घाटातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करतांना परशुराम घाटातून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी घाटातील कटाई आणि रुंदीकरण आणि सुरक्षा वॉलचे काम लवकर पूर्ण व्हावे याकरिता महिनाभर हा घाट दिवसातून पाच तास दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कामाकरीता 25 एप्रिल ते 25 मे पर्यंत घाट वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.


पावसाळ्यात या घाटातून प्रवास करतांना काळजीपूर्वक प्रवास करावा लागणार आहे. हा घाट रुंदीकरणात ठिकठिकाणी कापण्यात आला आहे. शिवाय या घाटातील माती भुसभुशीत असल्याने सरकर खाली सरकते. या मातीत अजिबात चिकटपणा नसल्याने घाटात काही ठिकाणी माती खाली सरकण्याची चिन्ह नाकारता येत नाही.सुरक्षा भिंत आणि ओढलेला मातीचा ढिगारा यातील अंतर कमी आणि यातुनच प्रवास ही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटातून प्रवास करतांना सावधगिरीने प्रवास करावा लागणार आहे.


जागेच्या मोबदल्यावरुन परशुराम ट्रस्ट आणि गावकरी यांच्यातील वादामुळे या घाटाचे काम काही वर्षे रखडले. त्यात घाट तसाच राहिला. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या घाटाचा एक भाग खालच्या बाजूला खचला गेला. काही दिवस घाट प्रवासासाठी बंद केला गेला. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या मार्फत तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी करण्यात आली. तर घाटाचे काम पावसाळ्यापुर्वी जलदगतीने व्हावे यासाठी घाट महिनाभर बंदही ठेवण्यात आला. या महिन्याभरात घाटाचे काम अवघे 65 टक्के पूर्ण झाले. पण घाटातील खचलेला भाग तसाच राहिला. आता घाटाचे काम दोन कंपनीत विभागले गेले आहे. घाटाचा अर्धा भाग खेडकडे येतो तो कल्याण टोलवेज कंपनीने तर घाटाचा दुसरा भाग चिपळूणकडे येतो तो इगल इंफ्राट्रक्चर कंपनीकडे आहे.


आता पावसाची सुरुवात आहे, जुलै महिना अजूनही बाकी आहे..दरवर्षी पावसाचे प्रमाण बदलत असते. त्यामुळे जोराचा पाऊस या भागात झाल्यास घाटातील खचलेला भाग अजूनही खचला जाऊ शकतो. शिवाय याच खचलेल्या भागावरुन अवजड वाहनांचा सध्या प्रवास सुरु आहे. हा घाटातील डोंगर दगड माती मिश्रित असल्याने त्याच डोंगराच्या मध्यातून महामार्ग आहे. पहिल्याच पावसात या खचलेल्या भागाची तीव्रता वाढत आहे. याच घाटातून प्रवास करून खेडच्या दिशेने गेल्यास अवघ्या काही अंतरावर मोठी MIDC असल्याने या घाटातून कंपनीकडे जाणाऱ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. सध्या पावसाची रिमझिम सुरु आहे..या घाटातील माती भुसभुशीत असल्याने ती लगेच खाली सरकते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडायच्या आधी प्रशासनाने याची दखल घेउन योग्य ती उपाययोजना केली पाहिजे अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.