Mumbai Crime: मुंबईतील वर्सोवा (Versova) भागात बनावट पोलिसांनी (Fake Police Officers) एका तरुणाकडून पैसे उकळले आहेत. अमली पदार्थ विभागाचे पोलीस अधिकारी (Narcotics Department Police Officer) असल्याचं भासवून 6 जणांनी 26 वर्षीय यश चावला नावाच्या तरुणाची फसवणूक केली आहे. ढोंगी पोलिसांनी तरुणाकडून 5 लाख 30 हजार रुपये उकळले आहेत. फिर्यादीला तुझ्यावर ड्रग्ज घेतल्याची केस दाखल करू, असं धमकावत त्याला रात्रभर रिक्षामध्ये फिरवून 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने एका मुख्य आरोपीला अटक केली असून इतर पाच जणांचा शोध पोलीस घेत आहेत.


पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश चावला याचं स्टेशनरी शॉप आहे. यश याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सदर प्रकार हा 30 जून रोजी घडला होता. त्यावेळी आरोपी असलेले बनावट पोलीस वर्सोवा येथील रेस्टॉरंट अँड बारमध्ये गेले आणि 4 जण पोलीस असल्याचं सांगून यश जवळ बसले. मग फिर्यादी तरुणाला धमकावून दोघे एका रिक्षात आणि इतर चार जण दुसऱ्या रिक्षात बसले. या सहा जणांनी अंमली पदार्थ विभागाचे पोलीस असल्याचं भासवून तरुणाला मुंबईभर फिरवलं.


सहा बनावट पोलिसांनी गूगल पे (Google Pay) आणि, NEFT द्वारे 5.30 लाख घेतले आणि सात लाखांचा चेक (Check) सुद्धा घेतला, जो नंतर बाऊन्स झाला. आरोपींनी मास्क लावून ही सर्व फसवणूक केली, यात रिक्षावाल्याचा देखील समावेश आहे. सहा आरोपींपैकी एक मुख्य आरोपी दीपक विलास जाधव (वय 36) याला अटक केली असून, तो स्वतः इंजिनिअर (Engineer) असल्याचा दावा करत आहे.


पोलिसांना तपासात असं समजलं आहे की, आरोपीवर जुन्या केसेस आहेत. अजून कोणत्या लोकांना त्याने असं फसवलं आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या संशयानुसार, आरोपीच्या जाळ्यात असे अनेक जण अडकले असणार आणि अनेक जण फसवणुकीला बळी पडले असण्याची शक्यता आहे. असा प्रकार कोणासोबत घडला असेल, तर त्यांनी समोर यावं आणि गुन्हा दाखल करावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. आरोपी मूळचा वाशिमचा आहे, पण सध्या तो गोरेगावला राहत होता. ताब्यात घेतलेल्या आरोपीला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.


हेही वाचा:


Chhatrapati Sambhaji Nagar: कुठे उद्योजकांमध्ये चोरांची भीती तर कुठे नशेखोरांमुळे व्यापारी हैराण; संभाजीनगरात नेमकं चाललं काय?