Nashik News : एकीकडे जिल्हा प्रशासन म्हणतंय की नाशिक (Nashik) जिल्ह्यातील स्मशानभूमी नसलेल्या गावांचा सर्वे करून असंख्य गावांना स्मशानभूमी (Cemetery) मंजूर केल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्याच गावातील अंत्यसंस्कार उघड्यावर होणार नाही. मात्र आजही परिस्थिती बदललेली नाही. सुरगाणा तालुक्यातील एका गावात भर पावसात दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. याच सुरगाण्यात (Surgana) मागील वर्षी देखील अशीच परिस्थिती होती, मात्र यंदाही तेच हाल पाहायला मिळत आहेत. 


नाशिक (Nashik) जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक आणि विकसित असा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र दुसरीकडे पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा सारख्या तालुक्यात आजही पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. आज पावसाळा (rainy Season) सुरु होऊन महिना उलटला तरीही पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ माउल्यांवर रोजचीच आहे. अशातच सुरगाणा तालुक्यातील उंबरदे गावात दोन वृद्धांचे आकस्मिक निधन झाले. मात्र स्मशानभूमी नसल्याच्या कारणाने भर पावसात गावकऱ्यांनी ताडपत्री धरून मृतदेहांवर अंत्यंसंस्कार (Funeral) केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह राजकीय नेत्यांची आश्वासने हवेत मुरल्याचे चित्र आहे. 


सुरगाणा तालुक्यातील पळसन ग्रामपंचायतमधील उंबरदे येथे स्मशानभूमी अभावी भर पावसात ताडपत्रीखाली दोघांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरगाणा तालुक्यातील उंबरदे येथे दोन वयोवृद्धाचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. मात्र सकाळपासून परिसरात पाऊस असल्याने अडचण येत होती. अखेर ग्रामस्थांनी सरण रचताना चितेवर चक्क ताडपत्रीच्या आधारे अंत्यसंस्कार केले. गावातून अनेकदा स्मशानभूमी बांधण्याची मागणी प्रशासनाकडे करूनही मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. स्मशानभूमी शेड नसल्याने अजूनही उघड्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. 


प्रशासनाचे मागणीकडे दुर्लक्ष 


राज्य शासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र आजही अनेक गावात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरेएवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून न्यावे लागतात. स्मशानभूमी शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. त्यामुळे अनेकदा मृतदेह अर्धवट जळतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. पळसन गावच्या ग्रामपंचायतीत 11 महसुली गावे तर 4 पाडे समाविष्ट असून उंबरदे (प), पातळी, पायरपाडा, वाघाडी, देवळा, कोटबा, मेरदाड, पळशेत आदी गावात एक ना अनेक समस्या असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.