Congress Agitation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबई काँग्रेसच्या वतीने भाजप खासदार पूनम महाजन यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, पूनम महाजन यांच्या घराकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही अंतरावर रोखले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. नरेंद्र मोदी माफी मांगो असे म्हणत हे आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांना मात्र, यावेळी काही अंतरावर असलेल्या ओएनजीसी येथे आंदोलकांना थांबवले आहे. 

Continues below advertisement


दरम्यान, आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत आहोत, त्यामुळे पोलिसांनी आम्हाला आडवू नये असे भाई जगताप यावेळी म्हणाले. तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. मोदींचा मात्र माननीय असा उल्लेख केला. त्यामुळे पियुष गोयल यांचाही निषेध आम्ही करत आहोत. त्यांनी देखील  माफी मागायला हवी असे भाई जगताप यावेळी म्हणाले.
 
काँग्रेस सध्या सातत्याने भाजप नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करत आहे. आज पुनम महाजन यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. आंदोलनावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. पुनम महाजन यांची भेट घ्यायची नाही तर त्यांच्या घरासमोरच आम्हाला आंदोलन करायचे असल्याचे काँग्रसे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. 


नेमकं काय म्हणाले होते पंतप्रधान


देशात करोनाचा प्रसार आणि प्रादूर्भाव वाढण्यास महाराष्ट्रातील सरकार आणि काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. पंतप्रधानांनी राज्यातील जनतेचा अवमान केला असून त्यांनी माफी मागावी, यासाठी राज्यभरात काँग्रेसकडून भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलने केली जात आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: