Crime News : वेश्याव्यवसायाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन 40 हजार रुपये उकळले, दोन तोतया पोलिसांना ठोकल्या बेड्या
Crime News : वेश्याव्यवसायाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन 40 हजार रुपये उकळणाऱ्या दोन तोतया पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांवर भाईंदर पूर्वेकडील नवघर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : वेश्याव्यवसायाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन 40 हजार रुपये उकळणाऱ्या दोन तोतया पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. सुदर्शन खंदारे आणि जितेंद्र पटेल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. भाईंदर पूर्वेकडील नवघर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित आरोपींनी एका योजनेअंतर्गत स्वत:ला बनावट पोलीस असल्याचे दाखवून तक्रारदार महिलेला वेश्या व्यवसायात अडकवण्याची धमकी देऊन तिच्याकडून 40 हजार रूपये उकळले आहेत.
पोलिसांनी अटक केलेले संशयित सुदर्शन खंदारे आणि जितेंद्र पटेल या दोघांनी तोतया पोलीस बनून नियोजन करून एका महिलेला वेश्या व्यवसायात अडकवण्याची धमकी देत तिच्याकडून पैस उकळले होते. या आरोपींनी पूर्ण प्लॅनिंग करुन तक्रारदार महिलेकडून पैसे लुटले होते. संबंधित महिलेला शंका आल्यानंतर तिने भाईंदर पूर्वेकडील नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दोघांचा भांडाफोड झाला.
असं करायचे नियोजन
संशयित सुदर्शन खंदारे आणि जितेंद्र पटेल यांची टोली प्रथम एखाद्या गरजू महिलेला आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यानंतर अशा महिलांचं घर काही तासासाठी भाड्याने घेतात. त्यानंतर नियोजन करुन एक वेश्या महिला आणि तिच्या ग्राहकाला त्या महिलेच्या घरात पाठवता. हे दोघे जण सबंधित महिलेच्या घरात दाखल झाल्यानंतर लगेच हे दोघे तोतया पोलिस बनून घरात दाखल होतात. यावेळी आपण पोलीस असल्याचं भासवतात. त्यानंतर वेश्याव्यवसाय चालवल्याबद्दल तिला अटक करण्याची धमकी देवून तिच्याकडून मोठी रक्कम उकळली जाते.
असा झाला भांडाफोड
दोन्ही संशयितांनी नेहमीप्रमाणेच नियोजन करुन 26 जानेवारी रोजी भाईंदरच्या जैन मंदिर येथे राहणाऱ्या एका महिलेचं घर काही तासांसाठी भाड्याने घेतलं होतं. त्यानंतर महिलेच्या घरात एक वेश्या महिला आणि तिचा साथीदार पुरुष दाखल होतात. त्याचवेळी आरोपी सुदर्शन खंदारे आणि जितेंद्र पटेल यांनी प्रवेश करत पीडित महिलेला तुम्ही वेश्या व्यवसाय चालवता, तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल. याबाबत माध्यमात कळवेन, सोसायटीत बोंबाबोंब होईल अशी धमकी देत पाच लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती 40 हजार देण्याचं ठरलं. पीडित महिलेने आपले दागिने गहाण ठेवून 40 हजार रुपये दिले. मात्र, पीडित महिलेला शंका आल्याने तिने नवघर पोलिस ठाण्यात फोन करुन पोलिसांना बोलावून घेतलं. प्रथम या तोतया पोलिसांनी आपण मिरा रोड पोलिस ठाण्याचे असल्याचे भासवून नवघर पोलिसांना पैशाचं आमिष दाखवलं. मात्र, पैशांच्या आमिषाला बळी न पडता नवघर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून 40 हजार रूपये जप्त केले. दोघांवरही गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यासोबत आणखी कोणी सामील आहेत का याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.