मुंबई : राज्य सरकारच्यावतीने अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच विद्यमान राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, महिला (Women), शेतकरी आणि गृहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.  त्यापैकी सर्वात मोठा आणि क्रांतीकारी निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा होय. या निर्णयाच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे.  त्याच पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना आणखी सुलभ करण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, आता 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर, एका कुटुंबातील 2 महिलांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली. 


जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, एका कुटुंबातील दोन महिलांना ह्या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार, एक विवाहित आणि एक अविवाहित महिला भगिनींना देखील योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. आम्ही कुटुंब नियोजन करुन चूक केली का, असा जो सवाल येतो त्याच प्रश्नाचं उत्तरही यातून दिलंय, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, 1 जुलैपासून पुढील 60 दिवसांत जे अर्ज करतील, त्यांना 1 जुलैपासूनचे पैसे मिळतील आणि 1 ऑगस्टनंतर जे अर्ज करतील, त्यांना अर्ज केल्यानंतरच्या महिन्यापासून पैसे मिळतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद सभागृहात माहिती देताना दिली.


एजंटच्या नादी लागू नये


कोणीही एजंटच्या नादी लागू नका, कोणी एजंट येत असेल तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला, त्याला निलंबित करण्यात आलं आहे, त्यास बडतर्फ करण्याचाही विचार सरकार करत आहे. 


तर सेतू केंद्र रद्द होईल


या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मदत करावी म्हणून अंगणवाडी सेविका आणि सेतू केंद्रांना प्रति व्यक्ती किंवा प्रती अर्जासाठी 50 रुपये राज्य सरकार देणार आहे. या वरचे पैसे जर कोण्या सेतू केंद्राने घेतले, तर त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल, अशी तंबीच गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली. तसेच, यासंदर्भात तशी ऑर्डर काढली आहे, असेही त्यांनी सांगितले.  


दरम्यान, जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करता येईल, तेवढं आपल्याला जलद गतीने काम करता येईल. त्यामुळे, महिला भगिनींनी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. तसेच, ऑनलाईनसाठी पोर्टलवर येणाऱ्या अडचणीही काढल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.   


Devendra Fadnavis Video on Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस सभागृहात नेमकं काय म्हणाले?



हेही वाचा


''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार