Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ग्रामीण भागासह अनेक शहरात महिलांची मोठी झुंबड उडाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान अनेक ठिकाणी तलाठी आणि संबंधित शासकिय अधिकार्‍यांकडून     लाभार्थी महिलांची आर्थिक लूट केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत कारवाईचे आदेश दिले आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात दोषी अधिकार्‍यांवर निलंबनाच्या कारवाईच सत्र सुरू केलं आहे.  


मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्यात कारवाईच सत्र


अकोल्यात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून पैसे उकळणारा तलाठी राजेश शेळकेला निलंबित करण्यात आलंय. 'एबीपी माझा'नं यासंदर्भातील वृत्त दाखविलं होतं. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. राजेश शेळके हे शहरातील मोठी उमरी भागाचे तलाठी आहेत. मोठी उमरी येथील तलाठी कार्यालयात योजनेसाठी नोंदणी सुरू असतांना हा प्रकार घडलाय. दरम्यान, पैसे स्विकारतांनाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. परिणामी की कारवाई करण्यात आलीय. अमरावतीनंतर अकोल्यात लाडकी बहीण योजनेत पैसे घेणाऱ्या तलाठ्यावर प्रशासनाने ही कारवाई केलीय. सरकारने दिलेले कारवाईच्या सक्त आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर तलाठी शेळकेच्या या निलंबनाच्या  आदेशात एबीपी माझाच्या बातमीचाही उल्लेख करण्यात आला आहे.


अमरावतीत पहिला गुन्हा दाखल


अमरावतीत (Amravati News) लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात काल महिलांकडून पैसे घेत असल्याची बातमी एबीपी माझाने सर्वात आधी दाखवली होती. या बातमीची दखल घेत आज अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्यावर कारवाई करत तडकाफडकी निलंबन  करण्यात आले आहे. मंडळ अधिकारी संजय मिरासे यांच्या फिर्यादीवरून वरुड पोलिसांनी तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता तलाठी तुळशीराम कंठाळे यांनी पन्नास रुपये मागितले होते. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी याबत आदेश देत निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता अमरावतीत योजनेतील बहिणीकडून पैसे उकळल्याच्या प्रकरणात राज्यातील पहिला गुन्हा अमरावतीच्या वरुड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.


बुलढाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांशी अरेरावी करणे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदच्या खेर्डा येथील तलाठ्याला भोवले आहे. या गैरप्रकाराची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दोषी तलाठ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत कारवाईचे आदेश दिले आहे.


महत्वाच्या बातम्या