Chhatrapati Sambhajinagar: महाज्योती फेलोशिप (Mahatma Jyotiba fule research fellowship) मिळावी यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण कार्यालयात उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. महाज्योती फेलोशिप मिळावी या मागणीसाठी हे विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करत आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी स्वतः देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanavis) यांनी या विद्यार्थ्यांची बैठक घेत फेलोशिपचा प्रश्न सोडवणार असल्याचा आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही फेलोशिपचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.  


विद्यार्थ्यांना फेलोशिपची प्रतीक्षा 


महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने ओबीसी आणि व्हीजेएनटी वर्गातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती फेलोशीप देण्याचा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला होता. वारंवार आंदोलन करूनही फेलोशिप चा प्रश्न सुटत नसल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान आता विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 


विद्यार्थी संशोधन थांबवण्याचा तयारीत..


मागील वर्षी उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. यासाठी उच्चस्तरीय समितीला अहवाल पाठवण्यासाठीही सांगण्यात आले होते. मात्र तो अहवाल अजून आला नसून अनेक विद्यार्थी संशोधनाचे काम थांबवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 


महाज्योती फेलोशिप मधून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यास मिळतात...


महाजोती फेलोशिप मधून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला पहिले दोन वर्ष प्रति महिना 31 हजार तर पुढील तीन वर्षांसाठी 35 हजार राज्य सरकारकडून देण्यात येतात. या आधीच्या वर्षीही अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्यास अडचणी आल्याच्या तक्रारी समोर आल्या असून प्रत्यक्षात फिलोशीप देण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.


हेही वाचा:


MahaJyoti Fellowship : नोव्हेंबर 2022 यादी जाहीर, मात्र महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडी करणारे 1200 हून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत