पिंपरी चिंचवड : रेमडिसिव्हीरनंतर आता म्युकर मायकोसिससाठी (Mucormycosis) वरदान ठरणाऱ्या अँफोटेरिसीन बी आणि बेवासीझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झालाय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याचा पर्दाफाश केलाय. या टोळीमागे बंटी-बबलीचा हात असल्याचं तपासात समोर आलंय. बबलीसह पाच जणांना अँटी गुंडा स्कॉडने बेड्या ठोकल्या आहेत. पण मुख्य सूत्रधार बंटी अद्याप फरार आहे. डमी ग्राहक बनून पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी या टोळीशी साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप देखील एबीपी माझाच्या हाती लागली आहे. बबली ममता जळीत ही मोशी कोव्हीड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून काम पाहते. तर बंटी हा सोलापूरमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो. ही जोडगोळी सात हजार 814 रुपयांचं अँफोटेरिसीन इंजेक्शन तब्बल 21 हजारांना तर 54 हजारांचं बेवासीझुमॅब इंजेक्शन 65 हजारांना विक्री करत होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार अनेकांनी अनुभवला. पुढे दुसरी लाट ओसरत असताना हा काळाबाजार ओसरला. अशातच म्युकर मायकोसिस आजाराने तोंड वर काढलं. बघता-बघता या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. परिणामी यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा ही तुटवडा जाणवू लागला. याचा काळाबाजार होऊ नये म्हणून राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरणाचे अधिकार दिले. तरी काही बहाद्दर मागे हटले नाहीत. ही बाब पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कानावर पडली. मग पोलीस स्वतःच ग्राहक बनले. त्यांनी वाकडमधील गौरव मेडिकलचे मालक गौरव जगतापशी संपर्क केला. काळ्या बुरशीमुळं कुटुंबातील महिला त्रस्त आहे. त्यांना रोज पाच इंजेक्शनची गरज आहे. तुमच्याकडे अँफोटेरिसीन बी इंजेक्शन मिळतील, असं समजलं. कृपया किमान तीन इंजेक्शन उपलब्ध करून द्या. 18 हजार रुपयांना एक इंजेक्शन मिळेल असं गौरव म्हणाला. मला आपण पाच इंजेक्शन द्या, मी पंधरा हजाराला एक प्रमाणे खरेदी करतो. असे डमी ग्राहक पोलीस म्हणतात. सरतेशेवटी आधी इंजेक्शन उपलब्ध करतो, मग पुढचा व्यवहार ठरवू असं निश्चित झालं.
गौरवने इंजेक्शनची जुळवाजुळव करायला सुरुवात केली. यासाठी पाषाण येथील गणेश मेडिकलचा सेल्समन अमोल मांजरेकरला संपर्क केला. पुढे अमोलने कसबा पेठेतील युनिव्हर्सल हॉस्पिटलचा बाउन्सर गणेश कोतमेला आणि त्याने मोशी कोव्हीड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून काम करणारी बबली ममताकडे इंजेक्शनची मागणी केली. त्यानुसार बबलीने तिच्या सोलापूरच्या बंटीला फोन केला. त्यानुसार त्याने तीन अँफोटेरिसीन बी इंजेक्शन पाठवून दिले. दरम्यानच्या काळात नाना पेट मधील प्राप्ती मेडिकलचे मालक प्रदीप लोंढेशी एकाने संपर्क केला आणि बेवासीझुमॅब इंजेक्शन मिळवलं. दोन्ही इंजेक्शनचा बंदोबस्त होताच, व्हाट्सएपवर कळविण्यात आलं. त्यानुसार अँफोटेरिसीनच्या एका इंजेक्शनला 21 हजार तर बेवासीझुमॅब इंजेक्शनची 65 हजार रुपये दर ठरला. त्यानुसार अँटी गुंडा स्कॉडने सापळा रचून बबलीसह पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. बंटीचा मात्र शोध सुरू असल्याचं पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं.
रेमडिसिव्हीरनंतर आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) साठी वरदान ठरणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झालाय. हे या कारवाईने स्पष्ट केलंय. तेव्हा प्रशासन आता हा काळाबाजार कसं रोखणार हे पहावं लागेल.