मुंबई : तुम्हाला गजनी चित्रपट आठवतो का? गजनी सर्व काही विसरायचा... माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलना गजनीसोबत केली आहे. दोन लाखांपर्यंत कर्जाचे वन टाइम सेटलमेंट करू, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन म्हणून देऊ अशी घोषणा करणारे आणि विधानसभेत टाळ्या मिळवणारे अर्थमंत्री अजित पवार यांचा गजनी झाला आहे का? असा सवाल अनिल बोंडे यांनी विचारला आहे.


महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफीच्या नावाखाली स्वप्ने दाखविली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांची पूर्तता केली नाही. आज अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं तर सोडाच काही महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या कर्जमाफीचा लाभ ही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे टाळ्या मिळवणारे अजित पवार शेतकऱ्यांनाच विसरले की काय  असा सवाल बोंडे यांनी विचारला आहे.  


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने पीक विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलविल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे 4 हजार 234 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या कृषी मंत्र्यानी राजीनामा द्यावा किंवा उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.


 2019 पर्यंत केंद्राच्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील अन्नधान्य तसेच फळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्यारित्या मिळत होता.  मात्र, 2019 नंतर राज्य सरकारने विमा कंपन्यांसोबत संगनमत करून जे चुकीचे करार केले, त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा मोठा घात झाल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.  2019 च्या खरीप हंगामामध्ये 1 कोटी 28 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. तेव्हा तब्बल 85 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 5 हजार 795 कोटी रुपये मिळाले होते. दुसऱ्या बाजूला 2020 च्या खरीप हंगामात 1 कोटी 38 लाख शेतकऱ्यांनी पिक विमाा काढूनही फक्त 15 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी फक्त 974 कोटी रुपये मिळाले आहे. त्यामुळे खाजगी विमा कंपन्यांच्या घशात राज्याच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे 4 हजार 234 कोटी रुपये ठाकरे सरकारच्या चुकीमुळे गेल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.


 शेतकऱ्यांचा असा नुकसान फक्त ठाकरे सरकारने विमा कंपन्यांसोबत निकष बदलविल्यामुळे झाल्याचा आरोप करत हे दलालांचे सरकार असून त्यांनी विमा कंपन्यांसाठी दलाली केल्याचा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. खरीप 2020 मध्ये अवकाळी पाउस, चक्रीवादळ अशी अनेक संकट आलीत. कापसाचे उत्पादन बोंड अळीमुळे कमी झाले. सोयाबीन हाती आले नाही. बियाण्यांचे प्लॉट सुद्धा खराब झाले. सर्व पिकांची विदारक परिस्थिती असतांना सुद्धा विमा कंपन्यांनी कृषी विभागासोबत हात मिळवणी करून फक्त 15 लाख शेतकऱ्यांना 974 कोटी रुपयांची नुकसानभरपाई निश्चित केली असून त्यापैकी फक्त 743 कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांना उद्धव ठाकरे सरकारच्या आशिर्वादाने 4 हजार 234 कोटी रुपयांचा निव्वळ नफा खरीप 2020 मध्ये मिळाल्याचे आरोप बोडे यांनी केले आहे.