मुंबई: महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात 5 ते 75 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ हंगामी असून दिवाळीच्या दरम्यान महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याच महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान, केवळ दिवाळीच्या कालावधीसाठी एसटी प्रवास भाडेवाढ करण्यात येणार आहे. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.


एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली ही भाडेवाढ केवळ दहा दिवसांसाठी आहे. ही दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.


आरक्षण केलेल्या प्रवाशांना फरक द्यावा लागेल  


ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे  त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि  विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


या गाड्यांचा प्रवास महागला 


दादर ते स्वारगेट - साधी - सध्या 235 प्रस्तावित - 260 


दादर ते स्वारगेट - शिवशाही सध्या 350 प्रस्तावित- 385


मुंबई ते कोल्हापूर - साधी गाडी सध्या - 565, प्रस्तावित - 625 , शिवशाही- सध्या 840, प्रस्तावित - 925


मुंबई ते नाशिक- साधी गाडी सध्या 400, प्रस्तावित 445,  शिवशाही- 595, प्रस्तावित 655


मुंबई ते औरंगाबाद- साधी गाडी सध्या- 860 प्रस्तावित - 950, शिवशाही - सध्या 1280 प्रस्तावित - 1410


ही नवीन भाडेवाढ नाही 


एसटी महामंडळाने केलेली ही दरवाढ नवीन नाही. दरवर्षी दिवाळीत होणारी ही भाडेवाढ आहे. दिवाकर रावते ज्यावेळी परिवहन मंत्री होते त्यावेळी ही भाडेवाढ सुरु करण्यात आली होती. 


दिवाळीच्या दरम्यान 1494 जादा गाड्या सोडणार 


दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त 1494 जादा (Extra Buses for Diwali Vacation) बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जादा वाहतूक 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान चालवण्यात येणार आहेत. 


प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद प्रदेशातून 368, मुंबई 228, नागपूर 195, पुणे 358, नाशिक 274 व अमरावती येथून 71 बस गाड्या सोडण्यात येणार आहे.