Maharashtra Rain : राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या परतीच्या पावसानं शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला द्राक्ष पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे. पाहुयात कुठे कुठे परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे.
बीड जिल्ह्यात परतीच्या पावसानं सोयाबीन वाहून गेलं तर कापसाच्या झाल्या वाती
बीड जिल्ह्यात सध्या परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळं सोयाबीन आणि कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रात्रीपासूनच वडवणी तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं काढून ठेवलेलं सोयाबीन पाण्यात गेलं आहे. तर कापसाच्या शेतात देखील पाणी साचल्यानं कापसाच मोठं नुकसान होत आहे. यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनच क्षेत्र वाढला असून, परतीच्या पावसाचा या पिकांना मोठा फटका बसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल सोयाबीन पाण्यात वाहून जात आहे. तर दुसरीकडे कापूस सध्या फुटलेल्या अवस्थेत आसून सतत पडणाऱ्या पावसामुळं ते काळवंडून जात असल्यानं शेतकऱ्यांच मोठा आर्थिक नुकसान होत आहे.
नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर
नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर केला आहे. या परतीच्या पावसाने कापसाच्या वाती झाल्या आहेत. तर सोयाबीनला कोंब फुटले आहेत. गेल्या दहा दिवसांच्या जोरदार पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही पिके मातीमोल झाली आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी यामुळं दुबार-तिबार पेरणीनं आधीच शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसाचा पिकांना फटका बसला आहे. आता कापणीस आणि काढणीस आलेले सोयाबीन, मूग, कापूस ही पिकं परतीच्या पावसानं मातीमोल झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगाव, उमरी, बिलोली ,अर्धापुर, भोकर, नायगाव, माहूर, किनवट,मुखेड, मुदखेड ,धर्माबाद व देगलूर या सर्व तालुक्यात परतीच्या पावसानं अक्षरशः कहर केला आहे. कारण गेल्या दहा दिवसापासून जिल्हाभरात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच आहे.
लातूर शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी
लातूर शहर आणि परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाट पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सलग पाचव्या दिवशी पावसानं हजेरी लावील आहे. मागील पाच दिवसापासून लातूर शहर आणि परिसरात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. पिकं काढणीच्या वेळेलाच पावसानं पाच दिवसापासून सातत्य राखल्यामुळं मोठं नुकसान होत आहे. .
परभणीच्या दोन तालुक्यांना पावसानं झोडपलं
परभणीच्या जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील सेलू, पाथरीत मुसळधार पावसानं हजेरी लावली. तर सोनपेठ, गंगाखेड, मानवत तालुक्यात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळं पाथरी आणि सेलू तालुक्यातील सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात पावसाची हजेरी
अहमदनगर शहरासह परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगावमध्ये द्राक्ष बागांचे नुकसान
यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची (Rain) नोंद झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. अशातच परतीच्या पावसानं देखील राज्यातील काही भागात धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसानं पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील कासेगावमधील (Kasegaon) द्राक्ष (Grapes) बागांचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या दोन महिन्यापासून द्राक्षांच्या बागेतील पाणी हटलं नसल्यानं शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची जोरदार हजेरी, भात शेतीचं मोठं नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील कुडाळ, वैभववाडी, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्गमध्ये मुसळधार पाऊस पडला. विजांच्या गडगडाटासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. उभं भातपिक आडवं होऊन, भाताला कोंब, आल्यानं निकृष्ट दर्जाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: