मुंबई : लोकांचे वीजेचे बिल थकल्यास वीज तोडण्याची कारवाई करणाऱ्या उर्जा विभागाने राज्याच्या जलसंपदा विभागाचे तब्बल 2200 कोटी रुपये थकवलेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने छोटे जलविद्युत प्रकल्प उर्जा विभागाच्या महाजनकोकडून काढून घेऊन ते खासगी विकासकाला भाडेकरार करून बीओटी चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. एका अर्थाने पैसै थकवणाऱ्या उर्जा विभागालाच जलसंपदा विभागाने शॉक दिलाय. 


या आधी राज्यातील वीर- भाटघर विद्युत प्रकल्प बीओटी तत्वावर चालविण्यास देण्यात आला आहे. आता आणखी सहा जलविद्युत प्रकल्प महाजनको कडून काढून घेऊन बीओटी तत्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतलाय. आतापर्यंत जलसंपदा विभागाकडून धरणांची आणि विद्युत प्रकल्पांची उभारणी करुन ते प्रकल्प उर्जा विभागाला 35 वर्षांच्या भाडे करारावर चालविण्यास देण्यात येत होते. अशाप्रकारचे 27 जलविद्युत प्रकल्प जलसंपदा विभागाकडून उर्जा विभागाला भाडेकरारावर चालविण्यास देण्यात आलेत.  त्या बदल्यात उर्जा विभागाने जलसंपदा विभागाला करारामधे ठरलेली रक्कम देणे अपेक्षित आहे.  


मात्र महाजनकोकडून वेळेत पैसै मिळत नसल्याने थकबाकी 2200 कोटी रुपयांवर जाऊन पोहचलीय. नागरिकांकडून नव्या दरानुसार वीज बिल वसूल करणाऱ्या उर्जा विभागाने आपल्यालाही दर वाढवून द्यावा अशी जलसंपदा विभागाची अपेक्षा आहे. धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांच्या मेन्टेनन्ससाठी वेळेत पैसै परत मिळणे गरजेचे असल्याच जलसंपदा विभागाने म्हटलंय. खाजगी विकसकाला बीओटी तत्वावर प्रकल्प चालविण्यास दिल्यास पैसै मिळण्याची अधिक खात्री वाटल्याने जलसंपदा विभागाकडून महाजनकोसोबत पुढे करार वाढण्याऐवजी बीओटीचा मार्ग निवडायचा ठरवलं आहे. सध्या सहा लहान जलविद्युत प्रकल्प  बीओटी तत्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.  मोठ्या जलविद्युत प्रकल्पांबाबत आताच कोणता निर्णय घेण्यात आलेला नाही.


जलसंपदा विभागाकडून बी ओ टी तत्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झालेले प्रकल्प पुढीलप्रमाणे,


1.येलदरी जलविद्युत प्रकल्प 
2. वैतरणा जलविद्युत प्रकल्प 
3. भाटघर जलविद्युत प्रकल्प 
4 .कोयना तिसरा टप्पा जलविद्युत प्रकल्प 
5. कोयना धरण पायथा जलविद्युत प्रकल्प 
6. पैठण - जायकवाडी जलविद्युत प्रकल्प 



कोयना धरणाच्या मुख्य जलविद्युत प्रकल्पाचा यामध्ये समावेश नसून हा मुख्य प्रकल्प सध्या महाजनकोकडेच राहणार आहे. केवळ कोळवडे येथील तिसरा टप्पा आणि पायथ्याचा असे दोन लहान जलविद्युत प्रकल्प बीओटी तत्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.


संबंधित बातम्या :